हातातील कड मळणीयंत्रात अडकल! हाताचा पंजा कटला; सोयाबीन काढतांना झाला अपघात.. चांडोळ येथील घटना

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सध्या सोयाबीन कापणी आणि काढणीचा हंगाम सुरू आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान होऊ नये म्हणून कापणी नंतर लगेच मळणी करण्याचे काम शेतकरी करीत आहेत. मात्र घाई घाईत काम केल्याने अपघाताच्या घटना देखील समोर येत आहे. चांडोळ येथे मळणी करीत असताना यंत्रात हातातील कड अडकल्याने अपघात झाला, तरुणाच्या हाताचा पंजा कटला.

गणेश बैरागी(३०) असे जखमी तरुणाचे नाव आहे. गणेशचे स्वतःचे मालकीचे ट्रॅक्टर आहे, ते घेऊन तो मजुरांसह गणेश राऊत यांच्या शेतात सोयाबीन काढण्यासाठी गेला होता. यावेळी गणेश सुडीवरील सोयाबीनचे काड मळणी यंत्रात लोटण्याचे काम करीत होता.
यावेळी अचानक हातातील कडे मशीन मध्ये अडकले, वेळीच आरडाओरड केल्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी मळणी यंत्र लगेच बंद केले. मात्र तोपर्यंत गणेशच्या उजव्या हाताचा पंजा कटला, त्याच्या डोक्याला देखील मार लागला असून त्याच्यावर बुलढाण्यात प्राथमिक उपचार करण्यात आली, पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथे हलवण्यात आले आहे.