SUCCESS STORY पंखो से कुछ नहीं होता, हौसले से उडाण होती हैं! जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर गरुड झेप; शेतात राबणाऱ्या बापाची लेक झाली पोलीस.!
Updated: Feb 10, 2025, 12:57 IST
मलकापूर पांग्रा (अमोल साळवे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय..यशस्वी होण्यासाठी आवश्यक असते ती जिद्द, चिकाटी आणि मेहनत...मग अडचणी कितीही येऊद्यात..संकटाचा डोंगर जरी आडवा आला तरी तो भेदून समोर जाता येते ते मेहनतीच्या जोरावर..म्हणून अशक्य असं या जगात काहीच नसतं, फक्त आवश्यकता असते ती सातत्यपूर्ण प्रयत्नांची.. मलकापूर पांग्रा येथून जवळच असलेल्या ढोरवी गावातल्या गरीब शेतकरी कुटुंबातील शितल ने हेच साध्य करून दाखवलंय..शेतात राब राब राबणाऱ्या आई वडिलांची लेक शीतल दशरथ सोळंकी आता मुंबई पोलीस झाली आहे..
शीतलचे वडील दशरथ सोळंकी अल्पभूधारक शेतकरी आहेत. भाजीपाला पिकवून आणि विकून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शीतल देखील आईवडिलांच्या कामाला हातभार लावायची.मात्र एक दिवस आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करायचेच हा "संकल्प" शीतलने केला होता. या संकल्पाच्या पूर्तीसाठी १२ वी नंतर शीतलने मलकापूर पांग्रा येथील संकल्प क्लासेस मध्ये पोलीस भरतीची तयारी सुरू केली. पोलीस भरतीची तयारी शेतातील काम हे सगळं सोबतंच सुरू होतं..अखेर तिच्या प्रयत्नांना यश आलंय.शीतल आता मुंबई पोलीस मध्ये भरती झाली आहे. अडचण आहे, परिस्थिती नाही असे सांगत स्वतःच्या अपयशाचे भाबडे समर्थन करणाऱ्या अनेकांसाठी शितलची सक्सेस स्टोरी प्रेरणादायी आहे..
मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है !पंखों से कुछ नहीं होता,हौसलों से उड़ान होती है..!
या ओळी शीतलने सार्थ करून दाखवल्या आहेत.
शीतलच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी तिचा सन्मान केला.यावेळी कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते, तर शीतलच्या डोळ्यात दिसत होते ते आई वडिलांच्या कष्टाचे चीज केल्याचे समाधान..! यावेळी संकल्प क्लासेस चे शिक्षक वृंद, सरपंच नितीन पवार, पत्रकार ज्ञानेश्वर कळकुंबे, संदीप मुरकुट, गणेश शिंदे, विठ्ठल मुरकुट, संजय मुरकुट, सुखदेव सोळंके, सिद्धेश्वर सोळंके, गजानन सोळंके, सतीश मुरकुट, गणेश सोळंके, भीमराव साळवे गावातील नागरिक उपस्थित होते...