एसपी विश्व पानसरेंची खास संकल्पना! "ON THE SPOT FIR" योजनेची सुरुवात...! काय आहे ही योजना?

 
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाने सामान्य नागरिकांना जलद व प्रभावी न्याय मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाची योजना सुरु केली आहे. ‘ON THE SPOT FIR’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेची माहिती दिनांक ५ एप्रिल रोजी बुलडाणा येथे पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या योजनेंतर्गत, बुलढाणा जिल्ह्यातील कुठल्याही पोलीस स्टेशनला मोबाईल अथवा गोपनीय माहितीच्या माध्यमातून दखलपात्र गुन्हा घडल्याची माहिती मिळाली, तर त्वरित पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि डीबी पथक घटनास्थळी दाखल होतील. त्यांच्या सोबत लॅपटॉप, स्कॅनर, प्रिंटरसह आवश्यक साधनांनी सज्ज असलेले शासकीय वाहन असेल.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर अधिकारी थेट संगणकावर तक्रार नोंदवतील. तक्रारदाराच्या नोंदवलेल्या तक्रारीची प्रिंट काढून त्यावर त्याची सही घेतली जाईल. नंतर ही तक्रार स्कॅन करून संबंधित पोलीस ठाण्याच्या ई-मेलवर पाठवली जाईल असे विश्व पानसरे यांनी सांगितले.
 या योजनेच्या माध्यमातून पोलिसांकडून महिलांवर होणारे अत्याचार, बालकांवरील गंभीर गुन्हे, ज्येष्ठ नागरिकांवरील अन्याय यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये तात्काळ कारवाई होणार आहे. यामुळे घटनास्थळीच एफआयआरची नोंद होऊन तपासात वेळ न दवडता पुढील कार्यवाही शक्य होणार असल्याचे विश्व पानसरे म्हणाले.
“घटनास्थळीच तपास व तक्रार नोंदविण्याची ही योजना पोलिस सेवेत पारदर्शकता आणून सामान्य माणसाचं जीवन अधिक सुखकर करेल,” असा विश्वास एसपी पानसरे यांनी यावेळी व्यक्त केला.