खळबळजनक अन् चिंताजनक! जिल्ह्यात लेकीबाळींची अब्रु धोक्यात! ९ महिन्यांत तब्बल "एवढे"बलात्कार; ३३७ जणींची छेड काढली...
Oct 18, 2024, 10:16 IST
बुलडाणा(अक्षय थिगळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देशांत आणि राज्यात महिलांवर अत्याचाराचा घटना सातत्याने वाढत आहेत. विरोधी पक्षांकडून या मुद्यांवर सातत्याने सत्ताधाऱ्यांना घेरण्यात येते..अर्थात हा मुद्दाच तेवढा संवेदनशील आहे..महिला अत्याचाराच्या घटनांत बुलडाणा जिल्हा देखील मागे नाही..बुलडाणा जिल्ह्यातील महिला अत्याचाराचा आकडा देखील सगळ्यांची चिंता वाढवणारा आहे..गेल्या ९ महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात तब्बल ९५ बलात्काराच्या घटना जिल्ह्यात घडल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे..गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा १३ टक्क्यांनी वाढला आहे.
१३ तालुक्यांच्या बुलडाणा जिल्ह्यात एकूण ३३ पोलीस स्टेशन आहेत,त्यात आता सायबर पोलीस स्टेशनची नव्याने वाढ झाल्याने हा आकडा ३४ झाला आहे. सायबर पोलीस ठाण्यात केवळ ऑनलाईन क्राईमच्या गुन्ह्यांची नोंद ठेवली जाते. चिंतेची बाब ही की, उर्वरित ३३ पोलीस ठाण्यापैकी एकही पोलीस स्टेशन असे नाही की ज्या पोलीस ठाण्यात गत ९ महिन्यांत बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद नाही..
विनयभंगाच्या घटनाही वाढल्या...
गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या वर्षी २०२३ च्या जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांच्या काळात बलात्काराच्या ८२ घटनांची नोंद होती. यंदा त्यात १३ घटनांची वाढ झाली आहे. याशिवाय विनयभंग म्हणजेच छेडखानीच्या घटनाही वाढल्या आहेत. ९ महिन्यांत जिल्ह्यात ३३७ विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत..