सह्याद्रीची हिरकणी! सर्वात कमी वयात रॅपर डाऊन कोकणकडा! साखळी बु च्या चिमुकल्या सिद्धी ची कमाल!

 इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद! शेतकरी कन्येचे स्वप्न माउंट एव्हरेस्ट सर करण्याचे...! पहा थरारक व्हिडिओ...
 

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गुढीपाडव्याच्या शुभदिनी, महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगेतील कोकणकडा या धाडसी आणि अवघड गिर्यारोहण मोहिमेला अवघ्या ९ वर्षांची चिमुकली सिद्धी विठ्ठल सोनुने हिने यशस्वीरीत्या पेललं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिराचा मळा साखळी बुद्रुक इथल्या तिसरीत शिकणाऱ्या सिद्धीने आपल्या धैर्याचं आणि जिद्दीचं उदाहरण ठेवलं आहे.
३० मार्च २०२५ रोजी, पहाटे ४:३० वाजता पाचनाई गावातून चढाई सुरू करून, केवळ साडेतीन तासांत सिद्धीने हरिश्चंद्रगड व तारामती शिखर पार करत, सुमारे १८०० फूट उंचीचा कोकणकडा सर केला. यानंतर तिने भारताचा राष्ट्रध्वज कोकणकड्यावर फडकवला आणि पुन्हा रॅपलिंगच्या माध्यमातून – म्हणजे दोरीच्या सहाय्याने – दुपारी १२:३० पर्यंत कोकणकड्यावरून सुरक्षित उतरली.
सिद्धीच्या या पराक्रमाने तिचे केवळ गावच नव्हे, तर संपूर्ण जिल्हा, राज्य आणि देश अभिमानाने उंचावले आहेत. HimOrdile Trek Adventure संस्थेने तिच्या शौर्याला सलाम करत "सह्याद्रीची हिरकणी" अशी उपाधी बहाल केली. तिच्या या कामगिरीची नोंद India Record Book मध्ये सन्मानाने झाली आहे.
हीच सिद्धी इयत्ता पहिलीत असताना महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर, आणि यावर्षी २६ जानेवारीला हिमालयातील केदारकंठा (१२,५०० फूट) सर करून तिरंगा फडकवणारी बनली होती.
माउंट एवरेस्ट सर करण्याचं सिद्धीचे स्वप्न आहे. तिला वडिलांसह आ. संजूभाऊ गायकवाड, मुख्याध्यापक पांडव मॅडम, शिवाजी देशमुख सर, डॉ. शिवशंकर गोरे सर, जैन सर, गावचे सरपंच,उसरपंच यांचे नेहमी सहकार्य मिळते.
एक चिमुकली – पण मोठं स्वप्न.
सिद्धीचं हे धाडस आजच्या पिढीला प्रेरणा देणारं आहे. बुलडाण्याच्या मातीतील जिजाऊंची ही लेक भविष्यात देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावणार, यात शंका नाही. तिच्या यशाला आमच्याकडून मानाचा मुजरा आणि मनःपूर्वक शुभेच्छा!