डीजे नाही, ढोलताशा नाही... शेगाव तालुक्यातील कठोरा येथे वारकरी दिंडीसह साजरा झाला पारंपरिक लग्नसोहळा! पाहा व्हिडिओ...

 

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) — सध्या लग्न समारंभ म्हटले की डीजेचा गोंगाट, लखलखाट आणि लाखो रुपयांचा खर्च हेच दृश्य दिसते. मात्र, शेगाव तालुक्यातील कठोरा येथील एका शेतकऱ्याने समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवत आपल्या मुलाचा विवाह पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीने साजरा करून कौतुकास पात्र ठरले आहे.
 
 
कठोरा येथील शेतकरी प्रल्हादराव यांचे चिरंजीव प्रवीण आणि सौ. रूपाली यांचा विवाह धार्मिक पावनतेने शेगाव तालुक्यातील कठोरा येथे पार पडला. यामध्ये डीजे, बँडबाजा, लखलखाट टाळून संपूर्ण सोहळा वारकरी संप्रदायाच्या भक्तिरसात रंगला.
लग्नाआधी वऱ्हाडातील वऱ्हाड्यांसह नवविवाहित दाम्पत्याची मिरवणूक गावातून वारीच्या दिंडीसह काढण्यात आली. भजन, कीर्तन, टाळ–मृदुंगाच्या गजरात रथातून वर आणि वधूंची मिरवणूक गावभर फिरवली गेली. संपूर्ण गावानेही हा भक्तिमय सोहळा डोळे भरून पाहिला आणि साथ दिली.
या लग्न सोहळ्याने आधुनिक पिढीला आणि समाजाला एक सकारात्मक संदेश दिला आहे की, लग्नात खर्च नसतानाही श्रद्धा, सादगी आणि परंपरा यांच्यातून आनंद साजरा करता येतो.
प्रवीण–रूपाली यांचा हा अनोखा विवाह सोहळा आता परिसरात चर्चेचा विषय बनला असून, अनेकांनी याला “समाजाला दिशा देणारा विवाह” म्हणून गौरवले आहे.