राज्यपालांच्या हस्ते ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने सन्मान! शेगावचे सचिन पिंगळे आणि विजय बोराडे यांची राज्यस्तरीय निवड..
May 15, 2025, 15:05 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळामार्फत दिला जाणारा ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023’ या वर्षी बुलढाणा जिल्ह्यातील दोन कामगारांना जाहीर झाला आहे. एस.टी. महामंडळात कार्यरत असलेले शेगावचे सचिन लक्ष्मण पिंगळे आणि खामगाव येथील हिंदुस्थान लिव्हर लिमिटेडचे विजय बोराडे हे या मानाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
या पुरस्काराचे वितरण २३ मे २०२५ रोजी मुंबईतील कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सचिन पिंगळे – शेगावचा गौरव:
सचिन पिंगळे हे संत नगरी शेगावचे रहिवासी असून सध्या एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालय, बुलढाणा येथे लिपिक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या सेवेसोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांची निवड झाली आहे. त्यामुळे शेगावच्या नावात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
विजय बोराडे – औद्योगिक कामगिरीचा आदर्श
विजय बोराडे हे हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड, खामगाव येथे टीएफएच ऑपरेटर म्हणून कार्यरत असून, त्यांनी त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेसह अन्य क्षेत्रातील कार्यामुळे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पुरस्काराची पारदर्शक निवड प्रक्रिया:
या पुरस्कारासाठी राज्यभरातून कामगारांचे अर्ज मागवले जातात. परीक्षक मंडळाच्यावतीने तोंडी परीक्षा, मूल्यांकन प्रक्रियेनंतरच अंतिम निवड होते. यंदा राज्यभरातून केवळ ५१ कामगारांची निवड झाली असून, बुलढाण्यातून दोन जणांची निवड ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.
या पुरस्कारामुळे स्थानिक तरुणांना प्रेरणा मिळेल आणि कामाबरोबरच सामाजिक योगदान देण्याचे महत्व अधोरेखित झाले आहे. सचिन पिंगळे आणि विजय बोराडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.