EXCLUSIVE ती ३३ वर्षांपासून खात होती चक्क केस...! पोटात निघाला दीड किलोचा केसांचा गोळा; बुलडाण्यातील घटना...
Updated: Oct 19, 2024, 15:58 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):येथील प्रख्यात शल्य चिकित्सक डॉ.गणेश गायकवाड यांनी आपल्या गायकवाड हॉस्पिटलमध्ये अतिशय दुर्मिळ व किचकट असलेली शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. डॉ. गणेश गायकवाड यांनी आतापर्यंत अनेक आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून अनेक रुग्णांना जीवदान दिले आहे. समाजामध्ये काही मानसिक आजाराने त्रस्त मनोरुग्ण असतात. अशीच एक मानसिक आजाराने त्रस्त असलेली महिला व तिचे कुटुंबीय डॉ. गायकवाड यांच्याकडे पोटाच्या गंभीर आजाराच्या तपासणीसाठी आले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे काही तपासण्या करण्यात आल्या. ही महिला साधारण ३३ वर्षापासून केस खात होती.
(tricomania ) त्यामुळे तिच्या पोटामध्ये दीड किलो पेक्षा जास्त वजनाचा एक खूप मोठा गोळा तयार झाला. ही एक वैद्यकीय क्षेत्रातील अतिशय दुर्मिळ व आव्हानात्मक शस्त्रक्रिया होती. ही शस्त्रक्रिया डॉ.गणेश गायकवाड यांनी त्यांचे कौशल्य वापरून यशस्वीरित्या डॉ. गायकवाड हॉस्पिटल या ठिकाणी पार पाडली.
ही शस्त्रक्रिया करत असताना येथील भूलतज्ञ डॉ. विजय पाटील, सौ प्रतिभा गायकवाड व गायकवाड हॉस्पिटलमध्ये टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सहकार्य केले. किचकट व दुर्मिळ शस्त्रक्रिया बुलढाण्यासारखा शहरात यशस्वीरित्या करुन या रुग्णाला आता बरे वाटत आहे. याबद्दल डॉ. गणेश गायकवाड व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी व रुग्णांच्या नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे.