EXCLUSIVE भुकंप !भाजपच्या डोक्यात काय? शिंदे, पवारांना वाऱ्यावर सोडून भाजप स्वतंत्र लढणार.....काय आहेत कारणे..!

 
बुलडाणा
बुलडाणा(कृष्णा सपकाळ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय..बातमीचं शीर्षक वाचून आश्चर्य वाटण्याचं कारण नाही..गेल्या ५ वर्षात महाराष्ट्राने वेळोवेळी जे राजकीय नाट्य बघितले ते पाहता राजकारणात काहीही होऊ शकते याची खात्री आता तमाम महाराष्ट्रातील मतदारांना झाली आहे..कुण्या अमक्या पक्षाला अगदी बहुमताच्या जवळपास सर्वाधिक जागा मिळाल्या तरी त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईलच असे नाही. त्या पक्षाला विरोधी बाकावर देखील बसावे लागू शकते आणि ज्या पक्षांना जनतेने नाकारले ते आठ - दहा पक्ष एकत्रित येऊन सत्ता हस्तगत करू शकतात..एकंदरीत सध्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही..! आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे - फडणवीस आणि अजित पवार वरवर एकत्र दिसत असले तरी विधानसभा निवडणुका ते एकत्रित लढतीलच असे नाही.. अर्थात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू व्हायला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. सध्या प्रदेश भाजपकडून ज्या पद्धतीची जाहिरातबाजी सुरू आहे, त्यावरून या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे.
Hii
Related img.

 सगळ्या जर- तरच्या शक्यता लक्षात घेत भाजप निवडणूकीची तयारी करीत असतो. केवळ शिंदे आणि अजित पवारच नव्हे तर महाविकास आघाडीच्या इतर घटकपक्षांपेक्षाही भाजप निवडणुकीच्या तयारीत बराच पुढे आहे. सध्या निवडणुकीच्या तोंडावर केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या आधारावर भाजपकडून जाहिरातबाजी सुरू आहे. 👇
जाहिरातीतून शिंदे - पवार गायब...
  लाडकी बहिण योजना, राज्य सरकारची नमो किसान सन्मान योजना, सोयाबीन कापसाला ५ हजारांचे अनुदान या योजनांवर भाजपच्या प्रसिध्दी विभागाकडून जोर देण्यात येत आहे. खरे तर या योजना शिंदे - भाजपा आणि अजित पवार सरकारच्या एकत्रित महायुती सरकारने लागू केल्या आहेत. मात्र असे असले तरी भाजपने मात्र या योजनांच्या प्रचार प्रसिद्धीतून शिंदे आणि अजित पवारांना बाजूला सारल्याचे चित्र आहे. "रयतेचे सरकार, भाजपा महाराष्ट्र प्रदेश" असा मजकूर या जाहिरातीवर आहे. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो देखील या जाहिरातीवर झळकत असल्याने भाजपने स्वतंत्र लढण्याची देखील तयारी सुरू केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाऊ लागले आहे.👇
 शिंदे आणि पवारांचे उपद्रव मुल्य                       कमी करण्यात यश..
राज्यातल्या महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेकडे मुख्यमंत्री पद आणि अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री पद असले तर बहुतांश निर्णप्रक्रियेत फडणवीस यांचीच चलती असल्याचे उघडपणे बोलले जाते. राज्यात सध्यस्थितीत सगळ्याच पक्षांनी स्वतंत्रपणे लढायचे ठरवल्यास २८८ पैकी २८८ जागा लढवण्याची ताकद भाजप आणि दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसकडेच दिसते. शिवाय महायुती सरकारमधील शिंदे आणि अजित पवार यांचे उपद्रव मूल्य कमी करण्यात देखील भाजपला बरेच यश आले आहे.👇
शिंदे आणि पवार यांच्यावर असलेल्या गद्दारीच्या डागामुळे अस्तिवाच्या लढाईत त्यांनाच भाजपची जास्त गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जागा लढवण्याचा प्रयत्न भाजपकडून असणार आहे. भाजपच्या या महत्त्वकांक्षेला शिंदे आणि अजित पवारांकडून खोडा घातल्या जाऊ लागलाच तर भाजपकडे स्वतंत्र लढण्याचा पर्याय खुला आहेच. २०१४ चा वेगळे लढण्याचा अनुभव भाजपच्या गाठी आहेच. २८८ जागा लढवल्यास कार्यकर्त्यांना न्याय देता येणे, पक्ष संघटन मजबूत करता येणे अशा बऱ्याच गोष्टी भाजपला साध्य करता येऊ शकतात. वेगळे लढून अपेक्षित यश मिळाले नाही तरी सत्ता कशी काबीज करायची याचे धडे आता भाजपला चांगलेच अवगत आहेत.त्यामुळे शिंदे आणि पवारांना वाऱ्यावर सोडून भाजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाच तर आश्चर्य वाटायला नको..कारण..राजकारणात काहीही होऊ शकतं..हे ध्यानात ठेवायलाच हवं..!!