चिखली ठाणेदार संग्राम पाटील यांना ‘पोलीस महासंचालक पदक’ जाहीर! १५ वर्षांच्या उल्लेखनीय सेवेचा गौरव; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव...
Apr 30, 2025, 15:30 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांची पोलीस महासंचालक पदकासाठी निवड करण्यात आली आहे. पोलिस दलातील उत्कृष्ट आणि उल्लेखनीय सेवेबद्दल महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या वतीने हे पदक दिले जाते. संग्राम पाटील यांच्या १५ वर्षांहून अधिक काळातील सेवा, विविध जिल्ह्यांतील कामगिरी आणि स्थानिक नागरिकांशी उत्तम समन्वय या सगळ्याची दखल घेत त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
ठाणेदार संग्राम पाटील यांनी पुणे ग्रामीण, बुलढाणा, अकोला आणि मुंबई येथे सेवा बजावत असताना गुन्हेगारी आळा घालण्यात आणि जनतेशी विश्वासाचे नाते निर्माण करण्यात विशेष कामगिरी केली. त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात धाड, धामणगाव बढे, साखरखेर्डा व चिखली या ठिकाणी ठाणेदार म्हणून कार्यरत राहून स्थानिक पातळीवर जनसंपर्क, गुन्हे उकल आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यात कौशल्य दाखवले.
१ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने, बुलढाणा जिल्हा मुख्यालयी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते त्यांना पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात येणार आहे.
या गौरवाबद्दल सर्व स्तरातून ठाणेदार संग्राम पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे जिल्ह्याचाही मान उंचावला आहे.