

BIG BREAKING गुप्तधन काळ्या जादूचा प्रयोग? ओसाड पडलेल्या गावात गड्डा खोदलेला,पूजेचे साहित्य सापडले! गांगलगाव रोहडा रोडवरील प्रकारामुळे भीतीचे वातावरण...
Apr 16, 2025, 10:34 IST
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील रोहडा गांगलगाव रोडवरील रोहडा शिवारात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज,१६ एप्रिलच्या सकाळी उघडकीस आलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. रोहडा गांगलगाव रोडवरील रोहडा शिवारात एक जुने आमदरी नावाचे गाव होते, ते गाव आता ओसाड पडलेले आहे. गावातील घरांचे जुने अवशेष शिल्लक आहेत.. स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार एकाने आत्महत्या केल्यानंतर तिथे आता कुणीच जात नाही..अशा ओसाड पडलेल्या गावात कुणीतरी काळ्या जादूचा प्रयोग करून गुप्तधन काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे एक अंदाजे १० बाय १० चा खड्डा खोदलेला मिळाला असून तिथे पूजेचे साहित्य मिळून आले आहे. विशेष म्हणजे खोदलेला खड्डा अर्धा बुजवलेला आहे, त्यामुळे या बुजवलेल्या खड्यात काय? याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे..
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून अद्याप पोलिस घटनास्थळी पोहोचले नाहीत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार इथे आमदरी नावाचे जुने गाव होते. आता ते गाव ओसाड पडलेले आहे. गावातील काही नागरिक जवळच्या रोहडा येथे तर काही गांगलगाव येथे राहतात. या ठिकाणे एक मारुतीचे मंदिर असून ते जीर्ण झालेले होते, त्याचा जिर्णोद्धार ३ वर्षांपूर्वी झाला आहे. या मंदिरापासून काही अंतरावर आज सकाळी हा खड्डा खोदलेला आढळून आला..तिथे पूजेचे साहित्य देखील मिळून आले, इथे जवळच जुनी गढी असल्याने गुप्तधन काढण्याचा कुणाचातरी प्रयत्न असू शकतो अशी शंका आहे..
नरबळी देण्याचा प्रयत्न?
गुप्तधन काढण्यासाठी बऱ्याचदा नरबळी देण्याचा प्रयत्न होत असतो. त्यामुळे या प्रकरणात तसे काही झाले आहे का? तसे करण्याचा प्रयत्न झाला आहे का? हे शोधण्याचा देखील पोलिसांना प्रयत्न करावा लागणार आहे. खोदलेला अर्धा खड्डा बुजवलेला आहे, त्यामुळे तो खड्डा उकरून त्यात काही गडबड आहे का? याचा शोधही पोलिसांना घ्यावा लागणार आहे.