शहीद जवान सुनील नागरे यांना शेवटचा निरोप! शासकीय इतमामात मुळ गावी अंत्यसंस्कार..! भारत माता की जय, वीर जवान अमर रहे च्या घोषणा...

 

गंधारी, ता. लोणार (प्रेम सिंगी: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) –"जिवंतपणी मातृभूमीची सेवा, आणि मृत्यूनंतरही तिच्या कुशीतच विसावा..." – अशा असामान्य निष्ठेचे उदाहरण असलेले शहीद जवान सुनील अंबादास नागरे (वय ३२) यांना आज त्यांच्या मूळगावी गंधारी (ता. लोणार) येथे शासकीय इतमामात शेवटचा निरोप देण्यात आला. संपूर्ण गाव अश्रूंनी न्हाऊन निघाले होते, आणि आसमंतात केवळ एकच आवाज घुमत होता – शहीद जवान अमर रहे!
जवान अंतिमसंस्कार
Related img.

सुनील नागरे हे वयाच्या १८ व्या वर्षी भारतीय सैन्यात भरती झाले होते. कठोर प्रशिक्षण, देशसेवा, आणि नंतर NSG कमांडो म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाची कर्तव्ये पार पाडली. डिसेंबरमध्येच त्यांची मध्यप्रदेशातील सागर येथे बदली झाली होती. आपल्या कुटुंबाला देखील तिथेच घेऊन जाण्याचे त्यांचे स्वप्न होते.

 

परंतु नियतीने त्यांच्यासाठी काही वेगळेच लिहिले होते. ४ मे रोजी मध्यप्रदेशातील नरसिंहपूर रेल्वे स्थानकावर अपघातात त्यांना वीरमरण आले. ही बातमी कळताच संपूर्ण गाव सुन्न झाला. आज, ५ मे रोजी सकाळी १०:४५ वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. भारत मातेच्या जयघोषात त्यांना अंतिम निरोप देण्यात आला.

 

 

जवान अंतिमसंस्कार
Related img.

 

त्यांच्या पश्चात पत्नी माधुरी, ४ वर्षांचा मुलगा दक्ष, १२ महिन्यांची चिमुकली द्विजा, आई-वडील व बहीण असा कुटुंबीयांचा मोठा आधार आता हरपला आहे. दीड वर्षांनी ते सेवानिवृत्त होणार होते, पण त्याआधीच देशभक्तीच्या वाटेवर त्यांचा जीवनप्रवास थांबला.

 

शहीद जवान सुनील नागरे यांना 'बुलडाणा लाइव्ह'कडून शतशः श्रद्धांजली! देशासाठी दिलेले बलिदान कधीही विसरले जाणार नाही.