सावखेड भोई सर्कलमधील शेतांसाठी खडकपूर्णा धरणातून पाणी सोडा; मंत्री पाटील यांना राजू सिरसाट यांचे साकडे
देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील सावखेड भोई जिल्हा परिषद सर्कल भाग कायम दुष्काळी पट्टा राहिला आहे. हा भाग उताराचा असल्यामुळे या ठिकाणी जो पाऊस पडतो तो वाहून जातो. परिणामी या भागातील शेतीसाठी पाणी कमी पडते. त्यामुळे या भागातील शेतांसाठी खडकपूर्णा धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी सिंदखेड राजा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्ताने आलेल्या जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजू सिरसाट यांनी केली. खडकपूर्णा धरणातून सावखेड भोई जिल्हा परिषद सर्कलमधील सावखेड भोई, भिवगाव, निमखेड, गिरोली बुद्रुक, गिरोली खुर्द, गोळेगाव, तुळजापूर, पळसखेड मलकदेव, बोराखेडी, पळसखेड झाल्टा या गावांना कालव्याव्दारे पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात त्यांनी केली आहे. यावेळी सिंदखेड राजा विधानसभा अध्यक्ष गजानन पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा सभापतीपती गणेशराव बुरुकूल, सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा सेलचे अध्यक्ष दिलीप झोटे, अप्रीत मिनासे, गजानन चेके, अरविंद खांडेभराड आदी उपस्थित होते.