पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळावा उद्यापासून
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाइन पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन 23 ते 25 मार्च 2021 पर्यंत चालणार आहे. सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज या www.rojgar. mahaswayam. gov.in संकेतस्थळावर भरावे.
ऑनलाईन मेळाव्यात नामांकित खाजगी उद्योजक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून 200 पेक्षा अधिक पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविणार आहे. या भरतीमध्ये पात्र पुरुष, महिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील व पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी नाव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवी, नर्सिंग पदविका, (ए.एन. एम.,जी.एन.एस.) आय. टी. आय. पास, पदव्युत्तर, पुरुष व महिला उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा आयडी व पासवर्डचा वापर करून आपले लॉगीनमधून ऑनलाईन अर्ज करुन सहभाग नोंदणी करुन रोजगार प्राप्त करावा. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरिता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्याच ठिकाणावरून आपल्या सेवायोजन कार्डचा युझर व पासवर्डचा वापर करून आपल्या लॉगीनमधून ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होऊ शकतात. पात्र असलेल्या पुरुष, महिला उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदाकरिता सुध्दा ऑनलाईन अर्ज करू शकतात. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करताना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 07262-242342 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सु. रा. झळके, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.