देऊळगाव राजा : शिवसेना उपजिल्हा प्रमुखांच्या प्रयत्नांना यश, त्या रस्त्याचे काम मार्गी!
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा तालुक्यातील जालना- चिखली मार्गावरील शिंगणेनगर व सिव्हिल कॉलनी ते मराठवाड्यातील सातेफळ ते राजूर या दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी नगरसेवक पतींनी वारंवार प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. शिवसेना उपजिल्हा प्रमुख दीपक बोरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर शिखरे यांच्याकडे वारंवार या रस्त्याच्या मजबुतीकरण व रुंदीकरणाची मागणी केली होती.
कार्यकारी अभियंता श्री. शिखरे यांनी या रस्त्याची पाहणी करून प्रस्ताव तयार करून शासन दरबारी पाठवला होता. त्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. या एक किलोमीटर रस्त्याचे काम हे पावसाळ्या पूर्वीच पुर्ण करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिंगणे नगर व सिव्हिल कॉलनी तसेच मराठवाड्यात जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही. तसेच हा रस्ता श्रीक्षेत्र गणपती राजूर देवस्थान या रस्त्याला जोडणारा आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते.