चांडोळचे ग्रामविकास अधिकारी बोबडेंना वैतागले ग्रामस्थ!; ‘बीडीओं’कडे केली तक्रार, मनमानीला अधिकाऱ्यांचे अभय मिळत असल्याचा आरोप
चांडोळ (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चांडोळ येथील ग्रामविकास अधिकारी आर. के. बोबडे यांच्या मनमानीमुळे गावात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने ग्रामस्थांच्या तक्रारीही दूर्लक्षित केल्या जात आहेत. त्यांनी विकासकामांसाठी आलेला निधी कुठे, कसा आणि किती खर्च केला याचीही चौकशी करा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य देवसिंग रामलाल ब्राह्मणे यांच्यासह ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आजवर अनेक निवेदने, तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत, मात्र तरीही बोबडेंना मिळणारे अभय गावात चर्चेचा विषय ठरत आहे.
निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे, की ग्रामविकास अधिकारी बोबडे महिला ग्रामपंचायत सदस्यांना उद्धट वागणूक देतात. मासिक बैठकीत मनमानी करत ठराव घेतात. शासनाकडून आलेल्या निधीची माहिती देत नाहीत. निधी कुठे, कशावर खर्च केला हेही सांगत नाहीत. ग्रामपंचायतीत अवघे 1-2 तास थांबतात. त्यामुळे ग्रामस्थांची कामे होत नाहीत. कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतनही बोबडेंच्या मनमानीमुळे वेळेवर होत नाही. कर्मचारी असूनही कामांसाठी मजूर दाखवून बिले काढली जातात. मोजक्या पुढाऱ्यांना हाताशी धरून ते मनमानी कारभार करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात ग्रामस्थांनी केली आहे.