गॅस दरवाढीमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली!

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह) ः ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांना चुलीवरच्या धुरापासून मुक्ती मिळून पर्यावरणाचे संतुलन राखले जावे यासाठी मोठा गाजावाजा करीत केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेतून घराघरात मोफत गॅस जोडणी दिली. मात्र आता गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्याने ती केवळ शोभेची वस्तू बनली असून ग्रामीण भागातील अनेक कुटुंबाने पुन्हा एकदा चुली पेटवत …
 

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्‍ह) ः ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांना चुलीवरच्या धुरापासून मुक्ती मिळून पर्यावरणाचे संतुलन राखले जावे यासाठी मोठा गाजावाजा करीत केंद्र सरकारने पंतप्रधान उज्‍ज्वला गॅस योजनेतून घराघरात मोफत गॅस जोडणी दिली. मात्र आता गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्याने ती केवळ शोभेची वस्तू बनली असून ग्रामीण भागातील अनेक कुटुंबाने पुन्हा एकदा चुली पेटवत गॅस सिलिंडरला अडगळीची खोली दाखविली आहे.

सुरुवातीला दोन-पाच रुपयांची दरवाढ नंतर पंधरा- वीस रुपयांपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर पंधरवड्यापूर्वी तर थेट ५० रुपयांची दरवाढ झाली. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी या योजनेतून मोफत गॅस जोडण्या देण्यात आल्या होत्या.मात्र आता दरवाढ करताना या कुटुंबांना गृहीतच धरण्यात आलेले नाही.सुरुवातीला सिलिंडरच्या किमती ४०० रुपयांच्या घरात होत्या. आता त्या 845 रुपयांवर गेल्याने लाभार्थांनी महिन्याला एवढी रक्कम आणायची तरी कोठून? असा प्रश्न पडला आहे. गॅसचे दर प्रत्येक महिन्याला वाढतच असल्याने प्रत्येकाचे बजेट कोलमडले आहे. यात पगारदार, व्यावसायिक सुद्धा चिंतित असताना अल्प उत्पन्‍न असणाऱ्यांसमोर तर मोठे संकटच उभे ठाकले आहे. घरातील स्वयंपाकासाठी आता महिलांना भटकंती करीत गोऱ्या व सरपणासाठी जंगलात जाऊन गोऱ्या व सरपण जमा करावे लागत आहे.

साडेतीन हजारांची मिळकत अन्‌ सिलिंडरला 845 द्यायचे कुठून?

उज्‍ज्वला योजनेचे बहुसंख्य लाभार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. आर्थिक जनगणनेच्या आधारावर त्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. लाभार्थी कुटुंबाचे महिन्याचे उत्पन्न जेमतेम असते. त्यात घरातील रोज लागणारा किराणा, भाजीपाला याचा ताळमेळ बसविणे कठीण होत असताना आता गॅस सिलिंडरचे दर कसे परवडणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. महिन्याला जेमतेम तीन ते साडेतीन हजारांची मिळकत असणाऱ्या कुटुंबात सिलिंडरसाठी 845 रुपये आणायचे तरी कोठून ? असा प्रश्न निर्माण होत आहे.