सोयाबीन सोंगणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! पुढील ५ दिवस महत्वाचे...

 
शेतकऱ्यांसाठी
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात सध्या सोयाबीन सोंगणीचा हंगाम सुरू आहे. त्या कामासाठी अगदी मध्य प्रदेशातील मजूर देखील जिल्ह्यात दाखल झाले आहे, अवकाळी पावसाचा नेम नसल्याने लवकरात लवकर सोंगणी करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून पुढील ५ दिवस शेतकऱ्यांसाठी दिलासा मिळणार आहे.
 भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज २ ऑक्टोबर आणि उद्या ३ ऑक्टोबरला हवामान कोरडे राहणार आहे. ४ व ५ ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो, मात्र जिल्ह्यात बहुतांशी हवामान कोरडे राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे सध्या सोयाबीन सोंगणी करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला...
 रब्बी हंगामाची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते. रब्बी ज्वारीची पेरणी करताना जमिनीतील पुरेशा ओलाव्याची खात्री करावी. रब्बी पिकांसाठी शेतजमीन तयार करताना जमिनीतील ओलावा टिकून राहील या पद्धतीने मशागत करावी असा महत्वाचा सल्ला कृषी विज्ञान केंद्राकडून देण्यात आला आहे. सोयाबीनच्या शेंगांचा रंग बदललेला असल्यास पिकांची कापणी करावी, जेणेकरून परिपक्व झाल्यानंतर शेंगा खाली पडणार नाहीत आणि उत्पादनात घट होणार नाही असा सल्लाही देण्यात आला आहे.