दसरा पाण्यात जाणार? शेतकऱ्यांनो लागा रब्बीच्या तयारीला! हवामान विभागाने वर्तवला पुढील ५ दिवसाचा अंदाज;

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात जवळपास सोयाबीन सोंगणी आटोपली आहे..शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान हवामान विभागाने आज,११ ऑक्टोबरला पुढील ५ दिवसाचा हवामान अंदाज जाहीर केला आहे . त्यानुसार उद्या,१२ ऑक्टोबरचा दसरा पाण्यात जाण्याची चिन्हे आहेत..

 

Bhumi
Advt.👆

प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर द्वारा प्राप्त पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार बुलदाणा जिल्ह्यात दि.११ ते १२ ऑक्टोबर दरम्यान अनुक्रमे बहुतांश,काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.त्यानंतर दि.१३-१५ ऑक्टोबर दरम्यान तुरळक ठिकाणी अगदी हलका/हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.तर दि.११-१२ ऑक्टोबर दरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी सल्ला....
 
   संभाव्य पावसाची शक्यता लक्षात घेता, शेतकऱ्यांनी कापणी केलेला शेतमाल ताबडतोब सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा.साठवणूक शक्य नसल्यास संबंधित शेतमाल ताबडतोब ताडपत्रीने झाकून ठेवावा. गत दोन दिवस जिल्ह्यात झालेला पाऊस व येत्या दोन दिवसांतील संभाव्य पावसाचा अंदाज लक्षात घेता, जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा फायदा घेऊन शेतकरी बांधवांनी हरभरा,रब्बी ज्वारी,मका,करडई या पिकांची पेरणी करावी.
Bhumi
Advt.👆

मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने, शेतकऱ्यांनी स्वतःची व आपापल्या जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी.खराब हवामान परिस्थितीत जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावे. विजांबाबत अचूक पुर्वसुचना प्राप्त होण्यासाठी "दामिनी"मोबाईल ॲपचा वापर करावा असा सल्ला जिल्हा कृषी हवामान केंद्राने दिला आहे...