व्हाईस ऑफ मीडियाचा शुक्रवारी नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा; आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांनी घेतला विम्यासाठी पुढाकार!

 बुलढाणा जिल्ह्यातील व्हाईस ऑफ मीडियाच्या सदस्यांना मिळणार विमा कवच - अनिल म्हस्के 
 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पत्रकारांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी लढा उभारणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या उपक्रमांचे सातत्य कायम असून यंदाही बुलढाणा जिल्ह्यातील वाईस ऑफ मीडियाच्या सदस्यांना दहा लाखांचे विमा कवच मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे शुक्रवारी १० जानेवारी रोजी बुलढाणा येथील पत्रकार भवन परिसरात सकाळी १० वाजता जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. याच वेळी व्हाईस ऑफ मीडियाच्या नवीन जिल्हा कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा देखील पार पडणार आहे. गत तीन वर्षांपासून व्हाईस ऑफ मीडिया जिल्ह्यातील पत्रकारांचा विमा मोफत काढत आहे, हे विशेष! 

कोरा

 बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून डाकघर अधीक्षक गणेश अंभोरे, व्हॉइस ऑफ मिडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील, राज्य संघटक सुधीर चेके पाटील, राज्य कोअर कमिटी सदस्य अरुण जैन, विदर्भ संघटक सिद्धार्थ आराख, जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे, विभागीय कार्याध्यक्ष अजय बिल्लारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. गत महिनाभरात व्हाईस ऑफ मीडियाचे सदस्य नोंदणी अभियान पार पडले. राज्य कोअर कमिटीच्या बैठकीत कार्यकाळ पूर्ण झालेल्या जिल्हास्तरीय समित्यांचे पुनर्गठण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याद्वारे बुलढाणा जिल्ह्यातही नव्याने या कार्यकारणी चा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याच वेळी गत तीन वर्षांची परंपरा सुरू ठेवत १० लाखाचे विमा कवच जिल्ह्यातील पत्रकारांना देण्याचा आपला उपक्रम प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांनी कायम ठेवला आहे. या आधीच्या एका कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी व्हाईस ऑफ मीडियाच्या सदस्यांचा विमा काढणार असल्याचा शब्द दिला होता, तो शब्द पाळत आ. संजय गायकवाड यांच्या वतीने व्हाईस ऑफ मीडियाच्या सदस्यांचा १० लाखांचा विमा काढण्यात येणार आहे...

केवळ व्हाईस ऑफ मीडियाच्या सदस्यांनाच मिळणार विमा कवच ...
आधार कार्ड ,पॅन कार्ड आणि विम्यासाठी नॉमिनी म्हणून ज्यांना ठेवायचे आहे, त्यांचे आधार कार्ड. महत्त्वाचे म्हणजे गतवर्षीचे विमा काढण्यात आल्याचे कार्ड ज्यांच्याकडे आहे, त्यांनी ते कार्ड देखील सोबत आणल्यास ऑनलाईन प्रक्रिया सुलभ रीत्या पार पाडणे डाकघर विभागाला सोयीचे होईल. केवळ व्हाईस ऑफ मीडियाचे सदस्य असणाऱ्या सदस्यांनाच या कार्यक्रमामध्ये विमा कवच काढून मिळणार आहे असेही प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांनी सांगितले आहे.
पत्रकार भवनात पार पडली नियोजन बैठक..
१० जानेवारी रोजी करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या संदर्भात तयारी पूर्णत्वास नेण्यासाठी नियोजन बैठक पार पडली. यावेळी नोंदणी समिती, स्वागत समिती , भोजन समिती , विमा सहाय्य समिती, देखरेख समिती चे गठन करण्यात आले. बुलढाणा शहरात हा कार्यक्रम होत असल्याने आपण आयोजकाच्या भूमिकेत आहोत. त्यामुळे व्हॉइस ऑफ मीडियाच्या जिल्हा मुख्यालयी राहणाऱ्या पत्रकार सदस्यांनी विशेष परिश्रम घ्यावेत असे आवाहन या बैठकीत जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे यांनी केले. यावेळी विविध वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी, चॅनल्सचे प्रतिनिधी आणि संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.