जिल्ह्यात २१ चेकपोस्ट! अंतर्गत नाक्यांवर होणार कसून तपासणी! भरारी पथकेही तयार....

 
  
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्याच्या अंतर्गत सीमांवर २१ तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आज दिली. या ठिकाणांवर वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे. आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक विभागासह जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे.
आचारसंहिता लागू झाल्यामुळे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सार्वजनिक ठिकाण जसे रेल्वे स्टेशन, बसस्टॅण्ड, रेल्वेपूल, रस्ते, शासकीय बसेस, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इमारती यावर असलेले राजकीय पक्षाचे व जाहिरात स्वरुपाचे पोस्टर, बॅनर, होर्डिंग, झेंडे ४८ तासांच्या आत काढून टाकण्याच्या सूचना निर्गमित केल्याचे त्यांनी सांगितले. आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी फ्लाईंग स्कॉड (भरारी पथक),एफएसटी, व्हीडीओ टीम, दारू, रोकड, प्रतिबंधित औषधे यांची सखोल तपासणी, राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत अवैध, नशील्या पदार्थांच्या वाहतुकीसंदर्भात भरारी पथक तत्काळ कार्यान्वित करण्यात आले आहेत. जिल्ह्यात २१ नाके तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या सुविधेसाठी विविध मोबाइल ॲप सुरू केले आहेत. यात इनकोअर, सुविधा ॲप, सक्षम उमेदावर ॲप, सिव्हीजील, इएसएमएस ॲप समावेश आहे. सर्व ॲप हे मतदारांच्या सुविधेसाठी असून पारदर्शक व भीतीमुक्त निवडणूक पार पाडण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. मतदारांच्या सुविधेसाठी जिल्ह्यात मतदार सहायता केंद्राची स्थापना करण्यात आली असून १९५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.