आज आणि उद्या पालकमंत्र्यांचा जिल्हा दौरा; नियोजन व खरीप हंगाम आढावा बैठकीला उपस्थिती
May 15, 2025, 13:18 IST
बुलडाणा (जिमाका: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील हे १५ व १६ मे २०२५ रोजी दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यात जिल्हा नियोजन व खरीप हंगाम आढावा यासंदर्भातील महत्त्वाच्या बैठकांचा समावेश आहे.
दौरा कार्यक्रमानुसार, गुरुवार, दि. १५ मे रोजी मंत्री पाटील हे मुंबई येथून शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथे आगमन करतील व तो दिवस राखीव राहणार आहे.
शुक्रवार, दि. १६ मे रोजी सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृहात अभ्यागतांसाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक तर ३.३० वाजता खरीप हंगाम २०२५–२६ चा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीनंतर मंत्री पाटील यांचा मुक्काम पुन्हा शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथे राखीव असून, त्यानंतर ते सोईनुसार पुण्याच्या दिशेने रवाना होणार आहेत.
पालकमंत्र्यांच्या या दौऱ्यात जिल्ह्यातील शासकीय कामकाजाचा आढावा घेऊन आगामी खरीप हंगामासाठी नियोजनात्मक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.