पावसाने शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांवर पाणी; जिल्ह्यातल्या १४५ गावांना तडाखा;

४८ हेक्टर जमीन खरडून गेली!१६४२५ शेतकऱ्यांच्या ११५६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान...
 
बुलडाणा
बुलडाणा(राहुल रिंढे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात २ आणि ३ सप्टेंबरला तुफान पाऊस झाला. आधी रुसलेला पाऊस एवढा कोसळला की नदी नाले एक झाले. आधी कोरडे असलेले प्रकल्प दोनच दिवसांत ओव्हरफ्लो झाले. मात्र फायद्यापेक्षा हा पाऊस तोट्याचाच जास्त झाला..कारण या कोसळधार पावसाचा जिल्ह्यातील १४५ गावांना तडाखा बसला. तब्बल १६ हजारांवर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा हा पाऊस आता ओसरला असला तरी शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे.
 जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यातल्या १४५ गावांना या पावसामुळे नुकसानीचा तडाखा बसला.मोताळा आणि चिखली तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. मोताळा तालुक्यात तब्बल २१७५ शेतकऱ्यांचे ४६२० हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मुंग या पिकांचे नुकसान झाले.मोताळा तालुक्यातील ३१ गावे या नुकसानीने प्रभावित झाले.
चिखली तालुक्यातील ३२ गावांत नुकसानीची नोंद आहे. ४२५० शेतकऱ्यांचे २१५० हेक्टरवरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले.
बुलढाणा तालुक्यातील आठ गावातील ३५० हेक्टरवरील सोयाबीन, खामगाव तालुक्यातील २५ गावातील १७०० हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, शेगाव तालुक्यातील २० गावातील ९५० हेक्टर वरील सोयाबीन, कापूस, तूर , मेहकर तालुक्यातील ६ तर लोणार तालुक्यातील ५ गावांतील पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यात एकूण १४५ गावातील १६४२५ शेतकऱ्यांचे ११ हजार ६०९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात मेहकर तालुक्यातील ४८ हेक्टर जमीन पूर्णतः खरडून गेली आहे.