क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात मेहकर नगरपरिषद अव्वल! सर्वाधिक १४ बक्षिसांचे पारितोषिक पटकाविले

 
  
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हापातळीवर नगर परिषद कर्मचा-यांसाठी क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा व पर्यावरण संवर्धन इत्यादी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून नगर परिषद कर्मचाऱ्यांकरिता तीन दिवसीय जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव पार पडला. यामध्ये मेहकर नगरपालिकेने जिल्ह्यात सर्वाधिक १४ बक्षिसे पटकावली आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपालिका प्रशासनामार्फत सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील १३ नगरपंचायत व नगरपरिषदांमधील कर्मचाऱ्याऱ्यांनी विविध क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. यामध्ये सर्वाधिक १४ बक्षिसांचा वर्षाव मेहकर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर करण्यात आला. जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा समारोप जिल्हा क्रीडा संकुल बुलढाणा येथे करण्यात आला. १०० मीटर धावणे, ४०० मीटर रिले, ३किमि चालणे ,पोहणे , चेस, भालाफेक, गोळा फेक, क्रिकेट, कॅरम , बुद्धिबळ अशा विविध खेळ प्रकारांमध्ये सहभागी खेळाडू सहभागी झाले होते. संतोष राणे ,सुधीर सारोळाकर, श्रीकृष्ण जैवाळ, विशाल शिरपूरकर, गणेश डोंगरे, प्रियांका सुरवसे, प्रगती काळे, अमिता कळसकर, पूजा जेउघाले, ऋषी पंडित सारंग काळदाते, विजय दराडे यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची १४ बक्षिसे प्राप्त केली. कर्मचाऱ्यांचे मेहकर शहरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
        समारोपीय कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी शेलार, जिल्हा सह आयुक्त गंगाधर पेंटे, मुख्याधिकारी गणेश पांडे, मुख्याधिकारी बोबडे, मुख्याधिकारी डॉ .जयश्री काटकर बोराडे, जिल्हा क्रीडा अधिकारी यांसह अनेकांची उपस्थिती होती.