पत्रकार राजेंद्र काळे यांना ''आदर्श जीवन पुरस्कार".. राजमाता जिजाऊ जन्मोत्सव दिनी झाली घोषणा!

 
बुलढाणा:( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):- 
आदर्श जीवनाचा परिपाठ घालून देणाऱ्या राजमाता जिजाऊ माँ साहेब, त्यांच्याच जन्मोत्सव दिनी भारत शिक्षण प्रसारक मंडळाने ''आदर्श जीवन पुरस्कार" सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात "आदर्श" काम करणाऱ्या राजेंद्र काळे यांना जाहीर केला असून.. या पुरस्काराचे वितरण येत्या १९ जानेवारी रोजी होणार आहे.
भारत शिक्षण प्रसारक मंडळ देऊळगाव घुबे यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शेनफडराव घुबे यांनी हा पुरस्कार जाहीर करताना काढलेल्या पत्रात नमूद केले आहे की- सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील राजेंद्र काळे यांचे योगदान अमूल्य असून अतिशय साध्या रहाणीद्वारे त्यांनी उच्च विचारसरणीचा वेळोवेळी प्रत्यय दिला आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व "लेक माझी" चळवळीतील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या कविता व सोशल मीडिया पोस्ट प्रचंड लोकप्रिय होतात. गत ३० वर्षापासून ते सक्रिय पत्रकारितेत असून, सडेतोड राजकीय लिखाण करताना त्यांची लेखणी समाज हितासाठी कायम पाझरत राहिलेली आहे. पत्रकारितेसाठी त्यांचा विविध पुरस्कारांनी सन्मानही झाला आहे. त्यांना ''आदर्श जीवन पुरस्कार" जाहीर करताना संस्थेला अत्यानंद होत असून, या पुरस्काराचे वितरण रविवार १९ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता देऊळगाव येथील जानकीदेवी विद्यालयाच्या प्रांगणात होणार असल्याचे या पत्राच्या शेवटी श्री घुबे यांनी नमूद केले आहे.
आदर्शवत पुरस्काराचा आनंद- काळे
राजमाता जिजाऊ माँ साहेब आदर्शाच्या जननी. त्यांच्याच जन्मोत्सव दिनी आपल्याला जाहीर झालेला ''आदर्श जीवन पुरस्कार" खऱ्याअर्थाने आदर्श आहे. पत्रकारितेसाठी अनेक पुरस्कार मिळाले. पण अनेकदा विनोदाचा किंवा टिंगल-टवाळीचा विषय होणारी आपली साधी राहणी पुरस्कारासाठी "आदर्श" ठरली, याचा वेगळा आनंद होणे स्वाभाविक आहे. पत्रकारिता क्षेत्रात काम करतानाही आदर्श जीवन जगण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असतो, त्या प्रयत्नांची दखल घेतल्याबद्दल भारत शिक्षण प्रसारक मंडळ व शेनफडराव घुबे यांचे आभार मानतो.. अशी विनम्र भावना राजेंद्र काळे यांनी " बुलडाणा लाइव्ह"शी बोलताना व्यक्त केली.