शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! लवकरात लवकर पूर्ण करा "हे" काम– कृषी विभागाचे आवाहन

 
 बुलडाणा (जिमाका : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता आणि राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ७ वा हप्ता जुलै २०२५ च्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे. मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील ४,२९० शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि ४,७०५ शेतकऱ्यांचे आधार सीडिंग (DBT Enable) अद्यापही प्रलंबित असल्याने, हे शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून बँक किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँक खात्याशी आधार संलग्न करणे आवश्यक आहे, असे आवाहन कृषी उपसंचालक अनुराधा गावडे यांनी केले आहे.
Buldana live banner
जागरूक रहा
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक ६,००० रुपये तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गतही ६,००० रुपये प्रति कुटुंब दरवर्षी दिले जातात. त्यामुळे या दोन्ही योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास शेतकऱ्यांनी आपली बँक माहिती आणि आधार क्रमांक अद्ययावत करणे अत्यावश्यक आहे.
शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी कार्यालय, कृषी सहाय्यक किंवा गावातील नोडल अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.