अमडापूरच्या ठाणेदारांना मारहाण! आरोपीला न्यायालयाने घडवली अद्दल..! न्यायाधीश व्ही. व्ही. मुगळीकर यांचा निकाल काय? वाचा...

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील अमडापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना मारहाण केल्या प्रकरणी आरोपी संतोष वाकडे यास बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने ३ महीने कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. व्ही. मुगळीकर यांनी निर्णय दिला आहे.
मागील १८ मे २०१७ रोजी अमडापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भुषण रामराव गावंडे हे पोलीस कर्मचा-यांसह चिखली ते अमडापुर रोडवरील टाकरखेड मुसलमान येथील देवीच्या मंदीराजवळ झालेल्या अपघाताची पाहणी करण्यासाठी गेले होते. सदर अपघातात विनोद रामदास गायकवाड या इसमाचा जागीच मृत्यु झाला होता.यावेळी मृतकाचे नातेवाईक आणि गावातील ५० ते १०० रहिवासी त्यांना मृतदेहाजवळ जाण्यास विरोध करत होते.
त्यांनी रस्त्यावरील वाहतुक अडवून आपला संताप व्यक्त केला. त्यावेळी भूषण गावंडे व ईतर पोलीस कर्मचारी यांनी त्यांना समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतोष शिवाजी वाकडे( राहणार मंगरूळ नवघरे, तालुका चिखली) पुजांजी दगडु गायकवाड, गजानन मनोहर गायकवाड, गजानन रामदास खपके, निश्याम रामबंद्र वाघ, ज्ञानेश्वर जगन्नाथ डहाके, हनुमान माधव वाष, राजेंद्र सुखदेव वाघ यांनी पोलीसाविरूध्द वक्तव्य करून जमावास भडकवले .तसेच गावंडे व ईतर कर्मचारी यांच्या सोबत वाद घालुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला . आरोपी संतोष वाकडे यांन गावंडे यांच्या डोक्यावर दगड मारून त्यांना गंभीर जखमी केले.
   या परीस्थितीत सुध्दा पोलीसानी जमावाची समजुत काढुन मृतदेह उत्तरीय तपासणी साठी चिखली ग्रामीण रूग्णालय येथे रवाना केले. तसेच परीस्थिती नियंत्रणात आणली. 
प्रकरणी गावंडे यांनी पोलीस स्टेशन अमडापुर येथे दिलेल्या तकारीवरून वरील नमुद आरोपी विरुध्द भा.द.वि चे कलम ३५३, ३३२, ३४१, १४३, १४७, १४८, १४९ भा.द.वि व मुंबई पोलीस कायदा १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी दोषारोप पत्र विद्यमान न्यायालयात सादर केले.
सदर प्रकरणात अभियोग पक्षातर्फे फिर्यादी भुषण गावंडे, पोलीस कॉन्स्टेबल इदरसिंग जारवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. अरूणा देशमुख व तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांचे साक्षी पुरावे नोंदविण्यात आले. ते एकमेकांशी सुसंगत असल्याकारणाने महत्वपुर्ण व विश्वासहार्य ठरले.  
त्या आधारे तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश व्ही. व्ही. मुगळीकर साहेब यांनी आरोपी संतोष वाकडे यास भा.द.वी चे कलम ३५३ व ३३२ अंतर्गत दोषी ठरवुन आरोपीस प्रत्येकी ३ महीने सश्रम कारावास व ६,०००/- रू. दंड तसेच दंड न भरल्यास प्रत्येकी एक महीना कारावास अशी शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अड. सोनाली सावजी देशपांडे यांनी प्रभावीपणे, सरकारी पक्षाची बाजू मांडली. ईतर आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे..