

बालविवाह कराल तर शिक्षा अटळ! – अक्षयतृतीयेला जिल्ह्यात कडक उपाययोजना; 2 वर्षांची शिक्षा आणि 1 लाख दंडाची तरतूद ...
Updated: Apr 29, 2025, 14:45 IST
बुलडाणा (जिमाका: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : येत्या 30 एप्रिल रोजी अक्षयतृतीया निमित्त जिल्ह्यात बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना लागू केल्या आहेत. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 व महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2022 अंतर्गत, बालविवाह करणे अजामीनपात्र गुन्हा असून, संबंधित व्यक्तींना दोन वर्षांपर्यंत सक्तमजुरीची शिक्षा आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे.
जिल्ह्यात बालविकास प्रकल्प अधिकारी, ग्रामसेवक, पोलीसपाटील, अंगणवाडी सेविका यांना बालविवाह रोखण्यासाठी प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यांच्याकडून प्रत्येक गावात सतर्कतेने काम सुरू असून, गुप्त माहितीवर तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

कोणाला होणार शिक्षा?
बालविवाह ठरवणारे, तो पार पाडणारे, प्रोत्साहन देणारे, तसेच सहभागी असणारे – वर-वधूचे पालक, नातेवाईक, मित्रपरिवार, वाजंत्री, फोटोग्राफर, मंदिराचे विश्वस्त, सभागृह व्यवस्थापक, कॅटरिंग, प्रिंटिंग प्रेस या सर्वांवर कठोर कारवाई होणारआहे. इतकेच नव्हे तर, खोटी जन्म नोंद करणाऱ्या ग्रामसेवकांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
जिल्हा महिला व बालविकास विभागाने जनजागृती मोहिमाही हाती घेतली असून, नागरिकांना आवाहन केले आहे की, कोठेही बालविवाहाची माहिती मिळाल्यास तात्काळ 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
अक्षयतृतीया पवित्र, पण बालविवाह पाप! — चला, एकत्र येऊन हे पाप थांबवूया!