जऊळकाच्या सरपंचांना दिलासा!; तूर्त पद कायम
सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जऊळका (ता. सिंदखेड राजा) येथील सरपंच द्वारकाबाई सांगळे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा दिला आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ग्रामविकास मंत्र्यांनी त्यांना सरपंच पदासाठी अपात्र घोषित केले होते. या निर्णयाविरोधात सौ. सांगळे यांनी खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठाने मंत्र्यांच्या निर्णयाला स्थगिती दिली.
2017 मध्ये सौ. द्वारकाबाई सांगळे जनतेतून सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्याविरोधात नामदेव बुधवत यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. तक्रारीची चौकशी करून आयुक्तांनी त्यांना अपात्र घोषित केले होते. मंत्र्यांनी आयुक्तांचाच निर्णय कायम ठेवला होता. या निर्णयाविरोधात सौ. सांगळे यांनी खंडपीठात दाद मागितली. त्यावर 8 मार्चला सुनावणी होऊन मंत्र्यांच्या निर्णयाला खंडपीठाने स्थगिती दिली. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. पुरुषोत्तम पाटील, निखील वाघमारे, रिद्धी त्रिवेदी यांनी काम पाहिले.