‘राष्ट्रवादी’तील बिघाडी… निष्ठावंत गटाकडून पक्षश्रेष्ठींची भेट; पालकमंत्री गोटाचे टवकारले कान!
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी परिवार संवाद अभियानाच्या समारोपात निष्ठावंत गटाने उचल खात पाटील यांच्याकडे दोनेकशे सह्यांचे लेखी निवेदन देत गार्हाणे मांडले होते. तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कमकुवत संघटन व विविध निवडणुकांत खालावलेली कामगिरी मांडत जिल्हाध्यक्ष बदलाची मागणी रेटली होती. याची दखल घेत पक्ष श्रेष्ठींनी निष्ठावंत गटाशी मुंबईत चर्चा केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. याची कुणकुण लागल्याने पालकमंत्री गोटाचे कान टवकारले असून, या चर्चेत नेमके काय शिजले याचा गुप्तपणे शोध घेण्यात येत असल्याचे समजते.
परिवार संवाद वरकरणी शांततेत पार पडला असे चित्र असले तरी ही वादळापूर्वीची शांतता आहे. याचे कारण जिल्ह्यात संघटनात्मक स्तरावर काहीच आलबेल नसून ताळमेळ नसल्याचे पाटील यांना चांगलेच समजून चुकले. पक्षाचेही पालकत्व सांभाळणार्या नेत्यालाही याची जाणीव झाल्याने लवकरच जिल्हा राष्ट्रवादी मध्ये व्यापक संघटनात्मक फेरबदल होणार असल्याचे वृत्त बाहेर आल्यावर व बुलडाणा लाईव्हने याचा सर्वप्रथम गौप्य स्फोट केल्यावर पक्षांतर्गत राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला. महत्त्वाच्या व संवेदनशील समजल्या जाणार्या अन्न प्रशासन खात्याचा भार, जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अन् जिल्हा राष्ट्रवादीचे पालकत्व अशी तिहेरी कसरत करणारे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांना हा विसंवाद (तक्रारी) जिव्हारी लागला. त्यामुळे ते या मर्यादित बंडखोरीचा बंदोबस्त करण्याच्या बेतात असतानाच निष्ठावंत गटाच्या एका शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींची भेट घेतल्याचे वृत्त आहे. या गटाचे नेतृत्त्व करणार्या नेत्यांनी बुलडाणा लाईव्हशी आज शनिवारी बोलताना या भेटीला पुष्टी दिली. मात्र भेटीचा तपशील देण्यास नकार दिला. योग्य वेळी योग्य बोलणे योग्य असते असे सांगून या नेत्यांनी वेळ मारून नेली. दरम्यान याची कुणकुण धूर्त राजकारणी समजले जाणारे पालकमंत्री डॉ. शिंगणे यांना लागल्याचे समजते. यामुळे सात्विक संताप व्यक्त करत त्यांनी आता प्रति कारवाईची (काउंटर अटॅक) तयारी चालविली असल्याचे समजते.