स्मारकांच्या पाहणीसाठी सुप्रिया सुळे सिंदखेड राजा येणार!; काझी यांची पत्रपरिषदेत माहिती

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिजाऊ जन्मस्थान असलेल्या ऐतिहासिक सिंदखेड राजा नगरीतील स्मारकांना राष्ट्रीय स्मारकांचा दर्जा दिला जावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी केली आहे. या संदर्भात काझी यांनी खा. सुप्रिया सुळे यांची नुकतीच भेट घेतली. भेटीत शहरातील ऐतिहासिक स्मारकांचे छायाचित्रांसह दस्तऐवज त्यांनी दाखवले. येत्या काही दिवसांत …
 
स्मारकांच्या पाहणीसाठी सुप्रिया सुळे सिंदखेड राजा येणार!; काझी यांची पत्रपरिषदेत माहिती

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिजाऊ जन्मस्थान असलेल्या ऐतिहासिक सिंदखेड राजा नगरीतील स्मारकांना राष्ट्रीय स्मारकांचा दर्जा दिला जावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी केली आहे. या संदर्भात काझी यांनी खा. सुप्रिया सुळे यांची नुकतीच भेट घेतली. भेटीत शहरातील ऐतिहासिक स्मारकांचे छायाचित्रांसह दस्तऐवज त्यांनी दाखवले. येत्या काही दिवसांत शहरातील या संपूर्ण स्मारकांची पाहणी करण्यासाठी सुप्रिया सुळे स्वत: शहरात येणार असल्याचे काझी यांनी पत्रकारांना सांगितले.

शहराचा सर्वांगीण विकास करताना ऐतिहासिक स्मारकांकडे दूर्लक्ष करता येणार नसल्याचे काझी म्हणाले. ९ सप्टेंबर रोजी नाझेर काझी, नरेश शेळके यांनी सुप्रिया सुळे यांची मुंबईत भेट घेतली. खा. सुळे यांनी राज्य व केंद्रीय पुरातत्व विभागाशी संपर्क साधून योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. पत्रकार परिषदेला विजय तायडे, शिवाजी राजे जाधव, राजेंद्र अभोंरे, संभाजी पेटकर, जगन सहाने, अॅड. संदीप मेहेत्रे, यासिन शेख यांची उपस्‍थिती होती. १२ जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्‍या हस्ते जिजाऊंची महापूजा व्हावी. त्याच बरोबर १२ जानेवारीला शासकीय सुटी घोषित करावी, अशी मागणीही काझी यांनी केली आहे.

जालना- खामगाव रेल्वे प्रश्नाकडे लक्ष
बहुप्रतिक्षीत, बहुचर्चीत जालना- खामगाव- शेगाव हा रेल्वेमार्ग होण्याबाबत अनेक वर्षांपासून मागणी आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपद राज्याला मिळाल्याने या बाबत लवकरच पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व आपण स्वत: मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेणार असल्याचे काझी यांनी या वेळी सांगितले.

तो अहवाल समाधान कारक नाही…
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ३०० कोटींच्या शहर विकास आराखड्याची चर्चा झाली. अहवालात २५० कोटी रुपये केवळ शहराच्या पुनर्वसनासाठी खर्च केले जाणार असल्याची बाब उल्लेखीत आहे. त्यामुळे हा अहवाल समाधान कारक नाही. त्यात योग्य गोष्टींचा उल्लेख नाही, असेही काझी यांनी सांगितले.

शिवशंकर भाऊंना पद्मविभूषण पुरस्कार द्या
कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी कोणतेही पुरस्कार स्वीकारले नाही. त्यांनी केलेले कार्य चिरकाल स्मरणात राहणारे असून, या कार्याचा आदर म्हणून त्यांना मरणोपरांत केंद्र सरकारचा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानीत करावे, या मागणीचा काझी यांनी पुनरूच्चार केला.

इको टुरीझम
शहराच्या दक्षिण- पश्चिम भागात वनविभागाचे २९८ हेक्टर विस्तीर्ण जंगल आहे. या जंगलात वन पर्यटन किंवा इको टुरीझम होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्‍याचे काझी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.