सरपंच पदासाठीच्या हालचालींनी कळस गाठला! 22 सरपंचपदांचा शुक्रवारी फैसला, 14 ठिकाणी चुरस
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी)ः सुमारे 1 महिन्यापासून सरपंच निवड न झालेल्या 22 ग्रामपंचायतींमधील इच्छुक सदस्यांच्या दीर्घ प्रतीक्षेचा सोक्षमोक्ष 19 मार्चला होणाऱ्या निवडणुकांनी होणार आहे. यामुळे महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर अर्थात 11 मार्चपासून सुरू झालेल्या 22 ग्रामपंचायत क्षेत्रातील राजकीय हालचालींनी आता निवडणुकीला अवघे 2 दिवस उरले असताना कळस गाठलाय! यातही आरक्षणामुळे 14 ठिकाणी तीव्र चुरस असल्याचे चित्र आहे.
प्रारंभी काढण्यात आलेल्या आरक्षणामुळे तेथील सरपंच पदाची निवड(णूक) रखडली होती. या ठिकाणचे सरपंचपदाचे आरक्षण नव्याने काढण्यात आले. अशा प्रलंबित सरपंच पदाची निवडणूक 19 मार्चला दुपारच्या रणरणत्या उन्हात पार पडणार आहे. निवडणूक होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींची नावे अशी ः जवळा बाजार, माळेगाव गौड, अलमपूर (ता. नांदुरा), पुन्हई, कोथळी, अंतरी, टाकळी वाघजल (ता. मोताळा), वरवट खंडेराव, पातुर्डा खुर्द, रुधाना, तामगाव, आलेवाडी (ता. संग्रामपूर), आरेगाव (ता. मेहकर), वरखेड (ता. मलकापूर), भोगावती, दिवठाणा (ता. चिखली), आडोळ बुद्रुक, वडशिंगी (ता. जळगाव), अजीसपूर (ता. बुलडाणा), पिंपरखेड (ता. सिंदखेड राजा), गोत्रा (ता. लोणार) गवंडाळा (ता.खामगाव). यातील 14 ठिकाणचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसींसाठी निघाले आहे. यातील 9 ठिकाणी पुरुषांनाही संधी आहे. तसेच 5 ठिकाणी ओबीसी महिला असे आरक्षण आहे. या प्रवर्गातील सदस्य व इच्छुकांची संख्या लक्षात घेता 14 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाकरिता कमालीची चुरस आहे. या तुलनेत अनुसूचित जाती व जमाती आरक्षण असलेल्या ठिकाणी तुलनेने कमी चुरस आहे. मात्र तरीही हे मानाचे पद आपल्याकडे वा किमान आपल्या पॅनेलकडे असावे. यासाठी गाव पुढारी, राजकीय सूत्रधार आग्रही आहेत. यामुळे राजकीय वाटाघाटी, रात्रीच्या भोजनावळी, फोडाफोडीचे राजकारण याला ऊत आल्याचे वृत्त आहे.