सरपंच पदावरच फोकस! 527 उपसरपंचांची निवडणूक ठरली उपेक्षित!! पण अनेक दिग्गजांसाठी ठरणार दिलासा
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 13 तालुक्यांतील 10 लाखांवर ग्रामीण मतदारांसह राजकीय क्षेत्राचे लक्ष व लक्ष्य केवळ आणि केवळ सरपंच या मानाच्या व राजकीय प्रतिष्ठेच्या पदाकडे लागले आहे. परिणामी त्याखालोखाल महत्त्वाचे पद असलेल्या उपसरपंचपदाची निवडणूक दुर्लक्षित व उपेक्षित ठरल्याचे मजेदार चित्र आहे. महिला आरक्षणामुळे 50 टक्के ग्रामपंचायतीत दिग्गज सदस्यांना उपसरपंच पदावर समाधान मानावे लागणार आहे. त्यांच्यासाठी तो राजकीय दिलासा ठरणार असतानाही या पदाची निवडणूक गौण ठरल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील 527 ग्रामपंचायतींची निवडणूक जानेवारी मध्यावर पार पडली. सरपंच आरक्षण देखील ठरल्याने जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रासह गाव पुढारी, कार्यकर्ते यांचे लक्ष सरपंच पदावर, निवडणुकीचा मुहूर्त यावर लागले आहे. मात्र पहिल्या सभेतच सरपंचा बरोबरच 527 उपसरपंच पदाची देखील निवडणूक होणार ही बाब गौण ठरली आहे. नियमानुसार ग्राम पंचायतीच्या पहिल्या सभेत सरपंच पदाची निवड होणार असून त्यासाठी आवश्यक असेल तर मतदान घेण्यात येईल. यानंतर उपसरपंच पदासाठी मतदान घेण्यात येईल. महिला सरपंच आरक्षणामुळे तब्बल 264 ठिकाणी दिग्गज, इच्छुकांची संधी हुकणार आहे. त्यांना उपसरपंच पदाचाच काय तो दिलासा राहणार आहे. काही ठिकाणी निघालेल्या मात्र याउप्परही डेप्युटी (सरपंच) ची निवडणूक उपेक्षित ठरली आहे.