संजय राठोड, हर्षवर्धन सपकाळ यांच्‍यासह 15 जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जिल्हा दौऱ्यात कोरोनाविषयक नियमांची ऐशीतैशी झाल्याचे पहायला मिळाले. बुलडाण्यातील दौऱ्यादरम्यान कोरोनाविषयक नियमांचा भंग केल्या प्रकरणी काँग्रेस नेते संजय राठोड, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह 15 पदाधिकारी, कार्यकर्त्यांविरुद्ध बुलडाणा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुपारी शेगाव आणि खामगाव पोलिसांनी अनुक्रमे 16 आणि 13 पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्‍या जिल्हा दौऱ्यात कोरोनाविषयक नियमांची ऐशीतैशी झाल्‍याचे पहायला मिळाले. बुलडाण्यातील दौऱ्यादरम्‍यान कोरोनाविषयक नियमांचा भंग केल्या प्रकरणी काँग्रेस नेते संजय राठोड, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्‍यासह 15 पदाधिकारी, कार्यकर्त्यांविरुद्ध बुलडाणा शहर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. दुपारी शेगाव आणि खामगाव पोलिसांनी अनुक्रमे 16 आणि 13 पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्‍हे नोंदवले होते. त्‍यानंतर बुलडाण्यातही गुन्ह्याची नोंद झाली. मात्र उत्तररात्रीपर्यंत चिखलीत नियमांना धाब्‍यावर बसवणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्‍हे दाखल न करण्याचे कारण काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्ह्यात दुपारी 4 नंतर निर्बंध लागू आहेत. असे असतानाही चिखलीतील कार्यक्रम झाला, हे विशेष.

बुलडाणा पोलिसांनी गुन्‍हा दाखल केलेल्यांत नेते संजय राठोड, हर्षवर्धन सपकाळ, सुनील सपकाळ, तालुकाध्यक्ष सुनील तायडे, शहराध्यक्ष दत्ता काकस, योगेश परसे, शैलेश खेडेकर यांच्‍यासह 10 ते 15 जणांचा समावेश आहे.
शेगाव शहर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांत तालुकाध्यक्ष विजय काटोले, पक्षनेते रामविजय बुरुंगले, खामगाव विधानसभेचे पक्षनेते ज्ञानेश्वर दादा पाटील, शेगाव पंचायत समितीचे माजी सभापती दयाराम वानखेडे, शैलेंद्र पाटील, जिल्हा अल्पसंख्याक आघाडीचे अस्लम खान, युवक काँग्रेसचे पवन पचेरवाल, शहराध्यक्ष दीपक सलामपुरिया, जिल्हा सरचिटणीस कैलास देशमुख, दिलीप पटोकार, सलमान राजा अस्लम शेख, पांडुरंग पाटील, ज्ञानेश्वर शेजोळ, काँग्रेस सेवादलाचे अनिल सावळे यांचा समावेश आहे. खामगावमध्ये कोणत्‍या 13 पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्‍हे दाखल झाले हे वृत्त लिहीपर्यंत कळू शकले नाही.

चिखलीचे काय?
नानांचा कार्यक्रम चिखलीत रात्री उशिरापर्यंत चालला. दुपारी 4 नंतर जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश असताना विनापरवानगी कार्यक्रम घेतला कसा आणि परवानगी असेल तर ती मिळाली कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्‍हणजे या कार्यक्रमाची छायाचित्रे पाहिली तर गर्दीने कोरोनाविषयक नियमांचा भंग केल्याचेही दिसून येते.