संजय राठोड यांचे पक्षातील वजन पुन्हा सिद्ध, विधानसभेची दावेदारी भक्कम ? प्रदेश कार्यकारिणीत वर्णी
बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांचे निष्ठावान व विश्वासू कार्यकर्ते ही संजय राठोड यांची ओळख, बुलडाणा विधानसभा मतदारसंघ व जिल्ह्यात वर्षानुवर्षे ही ओळख कायम ठेवतानाच त्यांनी आपल्यापरीने पक्ष संघटन वाढविले, काळ, वेळ, परिस्थिती बदलली पण त्यांची पक्ष व मुकुल वासनिक या दैवतावरील निष्ठा कायम राहिली. 26 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीमध्ये उपाध्यक्षपदी झालेली निवड वासनिक नामक करिष्माई नेत्याचा त्यांच्यावर असलेला अटळ विश्वास व त्यांनी जोपासलेली निष्ठा याचे फळ आहे. तसेच पुढील विधानसभेत बुलडाणा मतदारसंघातील त्यांची दावेदारी भक्कम करणारी बाब असल्याचे मानले जात आहे.
आपल्या पद्धतीने राजकारण करणाऱ्या संजय राठोड यांनी आपल्यावरील फाईव्ह स्टार स्टाईल नेता, शांत मवाळ राजकारणी, श्रद्धाळू भक्त, देवादिकांना खूप वेळ देणारा नेता, अशी होणारी टीका कधीच गंभीरपणे घेतली नाही. ते आपल्या पद्धतीनेच राजकारण करत आले व करत आहेत ( आणि करत राहणार). त्यांचे घराणे कट्टर काँग्रेसवादीच. कालकथित खासदार बाळकृष्ण वासनिक यांना 1980 च्या लोकसभा लढतीत राठोड कुटुंबियांनी जुन्या जाणत्या नेत्यांच्या दबावाला बळी न पडता मदत केली. संजय राठोड यांचा कार्यकर्त्यांचा एक मोठा गोतावळा आहे. त्यातील अनेक सामान्य कार्यकर्ते आज मोठे झाले. त्यांना पदे मिळाली. काहींना उमेदवारी मिळाली. त्यांनी सुचविलेल्या नावावर फुली मारण्याची हिंमत जिल्हा समितीने देखील केली नाही. एवढी ताकद ते ठेऊन आहेत. मात्र विधानसभेच्या उमेदवारीने त्यांना कायम हुलकावणी दिली. मुकुल वासनिक नामक ब्रह्मास्त्र पाठीशी असताना देखील त्यांना उमेदवारीच्या रणातच कधी हार पत्करावी लागली, कधी माघार घ्यावी लागली, विधानसभेच्या रणांगणात आपली ताकद, कौशल्य दाखविण्याची संधी मिळालीच नाही, ही खंत त्यांचीच नव्हे त्यांच्या चाहत्यांची देखील आहे. प्रदेशमध्ये दिग्गजासोबत या पदावर लागलेली वर्णी संभाव्य उमेदवारीचे शुभ संकेत असावे, अशी त्यांच्या चाहत्यांची भावना आहे. ( तसे ते देखील बरेच श्रद्धाळू आहेत. ) विधानसभेला 4 वर्षांचा कालावधी असताना मिळालेले हे मानाचे पद त्यांना राजकीय उभारी, ताकद देणारे आहे हे नक्कीच. काँग्रेसमध्ये अजूनही धक्कातंत्र व लॉबिंगचे राजकारण चालते, होऊ घातलेल्या विधानसभेत बुलडाण्याच्या उमेदवारी देताना याचा प्रत्यय येऊ शकतो. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचा गत लढतीत पराभव झालेला आहे, त्यात ते ‘बॉस’ पासून दूर गेलेले! अन्य प्रमुख दावेदार जयश्री शेळके यांना दिल्लीतून फारसे पाठबळ नाही. यामुळे राठोड यांचे भाग्य फळफळेल काय, हा भविष्याचा प्रश्न आहे. पण चान्स नाही मिळाला तर राठोड यांचे राजकारण धोक्यात येईल हे नक्की, या पदाचा सध्याचा अर्थ आणि अन्वयार्थ हाच आहे.