श्‍वेताताईंनी सांगितलं, शेगाव-जालना मार्ग कसा आहे फायदेशीर; अभ्यासपूर्ण पत्र पाहून पथकही भांबावले!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या शंभरपेक्षा जास्त काळ झालेल्या खामगाव- जालना रेल्वे मार्गाचे या अगोदरही सर्वेक्षण झालेले असून त्या सर्वेक्षणात हा रेल्वे मार्ग आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही, असा निष्कर्ष काढल्याने खामगाव- जालना या रेल्वे मार्गाचे काम होऊ शकले नाही. खामगाव- जालना या रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्यासाठी तांत्रिक स्वरूपाची आर्थिक पाहणी करण्याचे काम सुरू आहे. …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या शंभरपेक्षा जास्त काळ झालेल्या खामगाव- जालना रेल्वे मार्गाचे या अगोदरही सर्वेक्षण झालेले असून त्या सर्वेक्षणात हा रेल्वे मार्ग आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही, असा निष्कर्ष काढल्याने खामगाव- जालना या रेल्वे मार्गाचे काम होऊ शकले नाही. खामगाव- जालना या रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्यासाठी तांत्रिक स्वरूपाची आर्थिक पाहणी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे खामगाव- जालना या रेल्वे मार्गाचे खामगाव- जालना असेच सर्वेक्षण केल्यास आर्थिक दृष्ट्या ते फायद्याचे असणार नाही. त्यामुळे या प्रस्तावित मार्गाचे शेगाव- जालना असे सर्वेक्षण केल्यास आणि शेगाव खामगाव असा मार्ग झाला तर मुंबई- नागपूर आणि मुंबई- हैदराबाद हे दोन मोठे ब्रॉडगेज मार्ग जोडले जाऊन उत्तर, मध्य आणि दक्षिण भारत जोडले जाऊन शेकडो किलोमीटर अंतर कमी होईल. पर्यायाने प्रवासी आणि मालवाहतूक वाढून रेल्वेच्या उत्पन्नात अनेक पटींनी वाढ होईल. त्यामुळे या रेल्वे मार्गाचे शेगाव ते जालना असे सर्वेक्षण करण्याची मागणी आमदार सौ. श्‍वेताताई महाले पाटील यांनी खामगाव- जालना रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या तांत्रिक टीमच्या पथकाची भेट घेऊन लेखी पत्र देऊन केली आहे.

7 जानेवारी 2021 रोजी रेल्वे विभागाची सर्वेक्षण टीम चिखली येथे आली होती. यात सुरेश कुमार जैन (उपमुख्य परिचालन प्रबंधक सर्वे), रविकुमार, मुकेश लाल (मुख्य वाहतूक इन्स्पेक्टर), डी. ए. बोरसे (सिनियर सेक्शन इंजिनिअर), अजय खणके सर्वेअर यांचा समावेश आहे. पत्रात खामगाव जालना हा रेल्वे मार्ग कसा परवडणार नाही आणि शेगाव- खामगाव जालना हा मार्ग अनेक पटींनी उत्पन्न वाढवणारा असेल याचा अतिशय अभ्यासपूर्ण लेखाजोखा मांडण्यात आला आहे. पत्रात म्हटले आहे की, भारत सरकारच्या पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत ब्रिटिश काळातील शेकडो वर्षांपासून प्रलंबित असणार्‍या खामगाव – जालना रेल्वे मार्गाचे नुकतेच सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले आहे. या अगोदरही या मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आलेले होते. परंतु प्रत्येक वेळी हा मार्ग व्यावसायिक दृष्टीने परवडणारा नाही म्हणून या मार्गाला अद्यापपर्यंत मान्यता मिळालेली नाही किंवा या रेल्वे मार्गाचे काम झालेले नाही.

खामगाव- जालना रेल्वे मार्ग परवडणारा आहे, परंतु योग्य कारणमीमांसा झाली नाही सद्यस्थिती ः खामगाव ते जालना या दरम्यान रेल्वे नसल्याने मार्गावर कोणतेही मोठे व्यापारी केंद्र होऊ शकलेले नाही. रेल्वेमार्ग झाल्यावर ते विकसित होईल. जालना हे शहर जरी रेल्वे मार्गाला जोडलेले असले तरी खामगाव किंवा या मार्गाच्या मधील शहरे जसे, चिखली, देऊळगाव राजा ही या किंवा आजूबाजूचे कोणतेही शहर रेल्वे मार्गाने जोडलेले नाही. त्यातुलनेत चिखली आणि खामगाव या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र बरेच विकसित झालेले आहे. परंतु रेल्वे मार्ग झाल्यास हेच औद्योगिक क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहे. जालना शहरात ब्रॉडगेज रेल्वे मार्ग असला तरी खामगाव शहर कोणत्याही मोठ्या ब्रॉड गेज रेल्वे मार्गाला जोडलेले नसल्याने खामगावपर्यंतच रेल्वे मार्ग होऊन उपयोगाचे होणार नाही. कारण केवळ खामगाव आणि जालना या दरम्यान कोणत्याही मोठ्या गाड्या चालणार नाहीत. परंतु त्याकरिता खामगाव, शेगाव नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेज मार्गात रूपांतर करून, मुंबई- शेगाव या मार्गावरची प्रवासी वाहतूक ग्रहीत धरावी लागेल. या मार्गावर हजारो प्रवासी शहराव्दारे प्रवास करत असतात. त्यामुळे प्रदुषणातही वाढ होत आहे. परंतु, जालना-शेगाव असा सर्वे झाल्यास जालना, देऊळराजा, चिखली, खामगाव या गावांचा विकास होईल. शंभर वर्षांपेक्षा मोठा कालावधी या रेल्वे मार्गाने घेतला. आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारने या रेल्वे मार्गाबाबत संवेदनशीलता दाखविली नाही. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या रेल्वे मार्गाबाबत सकारात्मकता दाखवून या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मान्यता देऊन तब्बल तीन हजार कोटी रुपयांची मोठी तरतूदही करून दिली आहे. आता सर्वेक्षणास मान्यता मिळाल्याने आणि सर्वेक्षणाची भारतीय रेल्वेच्या तांत्रिक अधिकार्‍यांची टीम जालना आणि बुलडाणा जिल्ह्यात आलेली आहे. परंतु ठरल्याप्रमाणेच जर केवळ खामगाव जालना याच मार्गाचे सर्वेक्षण झाल्यास कदाचित पुन्हा खामगाव जालना रेल्वे मार्ग व्यावसायिक दृष्ट्या परवडणारा नाही असा निष्कर्ष निघेल आणि महत्प्रयासाने या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षण का होईना यासाठी मिळालेली मान्यता, झालेली तरतूद हो निष्फळ ठरेल आणि पुन्हा कधीच या रेल्वे मार्गाबाबत कोणताही प्रयत्न केल्या जाणार नाही. त्यामुळे खामगाव- जालना असे सर्वेक्षण न करता शेगाव- जालना असे सर्वेक्षण करण्यात यावे.

शेगाव- खामगाव- देऊळगाव राजा आणि जालना असे सर्वेक्षण झाले तरच आणि शेगाव- जालना असाच रेल्वे मार्ग झाला तरच तो रेल्वे मार्ग व्यवसायिक दृष्टीने परवडणारा ठरणार आहे. खामगाव- शेगाव हे फक्त 18 किमी अंतर वाढेल पण उत्पन्न शेकडो पटीने वाढेल. खामगाव जालना 165 किलोमीटर रेल्वेमार्गासाठी हे सर्वेक्षण प्रस्तावित आहे. यामध्ये खामगाव ते शेगाव या केवळ 18 किलोमीटर लांबीची वाढ केल्यास खामगाव जालना या ऐवजी शेगाव खामगाव जालना असे सर्वेक्षण झाल्यास आणि हाच रेल्वे मार्ग तयार झाल्यास केवळ 18 किलोमीटर वाढ केल्याने शेकडो पटीने रेल्वेचे उत्पन्न वाढणार आहे.

कारण ः शेगाव हे विदर्भ पंढरी संत गजानन महाराजांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून त्या ठिकाणी दररोज लाखो भक्त ये जा करीत असतात. शेगाव जालना रेल्वे मार्ग झाल्यास मराठवाडा व दक्षिण भारतातील भाविकांना सोयीचे होणार आहे. शेगाव हे मुंबई- नागपूर या ब्रॉडगेज लाईनवर तर जालना हे हैदराबाद, मुंबई या ब्रॉडगेज लाईनवर असल्याने शेगाव- जालना हा रेल्वे मार्ग झाल्यास मध्यभारत आणि दक्षिण भारत या रेल्वे मार्गाने जोडल्या जाणार असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रवासी आणि मालवाहतूक होईल पर्यायाने हा शेगाव जालना रेल्वे मार्ग व्यावसायिक दृष्ट्या नफ्यात राहील. पुण्याला जाण्यासाठी अंतर कमी होईल. कारण जामखेड औरंगाबाद या रेल्वे मार्गाचे सुद्धा सर्वेक्षण होत आहे. सद्यःस्थितीत नागपूर, अमरावती, अकोला येथील प्रवाशांना पुण्याला जाण्यासाठी किंवा पुण्यावरून येण्यासाठी मनमाड मार्गे जा ये करावे लागते.

खामगाव- जालना रेल्वे मार्गासोबतच जामखेड- औरंगाबाद या रेल्वे मार्गाचे ही सर्वेक्षण होणार असल्याने औरंगाबाद- जामखेड- नगर- पुणे हा रेल्वे मार्ग झाल्यास आणि जालना हे शहर अगोदरच औरंगाबाद या रेल्वे स्थानाकास जोडलेले असल्याने शेगाव- जालना रेल्वे मार्ग झाल्यास शेगाव वरून पुण्याला जाण्यासाठी औरंगाबाद जामखेड मार्गाने जाणे अतिशय सोपे, कमी खर्चाचे आणि जवळचे होणार आहे. शिर्डी आणि शेगाव जोडले जाणार शेगाव- खामगाव आणि जामखेड औरंगाबाद हे मार्ग झाल्यास शिर्डी आणि शेगाव हे महाराष्ट्रातील अतिशय गजबजलेले आणि प्रचंड भाविकांची गर्दी असणारे तीर्थक्षेत्र जोडले जाऊन रेल्वेला नवीन उत्पन्नाचे साधन मिळणार आहे.

सर्व तीर्थ व पर्यटनस्थळे जोडली जाणार

खामगाव – शेगाव या रेल्वे मार्गाला लागून बुलडाणा, शेगाव, अजिंठा लेणी, वेरूळ, लोणार सरोवर, माँसाहेब जिजाऊ जन्मस्थान सिंदखेड राजा ही जागतिक कीर्तीची पर्यटन आणि तीर्थक्षेत्र अगदी 50 ते 100 किलोमीटर अंतरावर आहेत. मुंबई, पुणे नागपूर किंवा अन्य मार्गाने निघालेले पर्यटक किंवा भाविकांना या सर्व पर्यटन स्थळे आणि तीर्थक्षेत्रे एकाच वर्तुळात मिळणार असल्याने पर्यटक आणि भाविकांची संख्या वाढून रेल्वेला फार मोठे उत्पन्नाचे साधन मिळणार आहे.

मेळघाट खांडवा या रेल्वे मार्गाचा सुद्धा फायदा होणार

मेळघाटवरून मध्यप्रदेशातील खांडवा या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेमार्ग प्रस्तावित आहे. हा रेल्वे मार्ग जळगाव जामोद येथून नेण्याबाबत बुलडाणा जिल्ह्यातील नागरिक आग्रही आहे. मेळघाट खांडवा हा रेल्वे मार्ग जळगाव जामोद वरून गेल्यास आणि शेगाव जालना हा रेल्वे मार्ग झाल्यास जलंब आणि जळगाव जामोद जवळच असल्याने आणि जलंब हे ठिकाण नागपूर मुंबई रेल्वेमार्गाच्या शेगाववरूनही जवळ असल्याने खांडवा मेळघाट हा रेल्वे मार्ग आणि शेगाव जालना हे दोन रेल्वे मार्ग एकमेकांना जोडले जाऊन उत्तर भारत, मध्य भारत आणि दक्षिण भारत जोडले जाणार आहे आणि सद्यःस्थितीत असणारे उत्तर भारत आणि दक्षिण भारत हे अंतर जवळपास 300 किलोमीटरने कमी होणार आहे.

राज्य शासनाकडून त्यांचा हिस्सा भरण्यास सहमती

आमदार सौ. श्‍वेताताई महाले यांनी खामगाव- जालना या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने आपला हिस्सा भरावा यासाठी अर्थसंकल्प 2020 अधिवेशनात तारांकित प्रश्‍न क्र. 1709 उपस्थित करून राज्य शासनाचे लक्ष वेधलेले आहे. राज्य शासनाने या रेल्वे मार्गासाठी राज्याकडून लागणारा निधी देण्याचे आश्‍वासन विधानसभेच्या सभागृहात दिलेले आहे. या संदर्भात वरिष्ठ रेल्वे अधिकारी आणि महाराष्ट्र शासनाची लवकरच बैठकही होणार आहे. त्यामुळे खामगाव जालना या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणासोबतच शेगाव खामगाव जालना असे सर्वेक्षण करावे जे सर्व दृष्टीने सोयीचे, आर्थिकदृष्ट्या परवडणारे, उत्तर व दक्षिण भारताला जोडणारे तसेच बुलडाणा जिल्ह्यातील औद्योगिक विकास घडवून आणणारे ठरेल. अन्यथा खामगाव जालना याच रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण झाल्यास एकतर ते मान्य होणार नाही आणि मान्य झाले आणि सिंगल रेल्वे मार्ग अस्तित्वात जरी आला तरी केवळ खामगाव जालना या दरम्यानच एक छोटी रेल्वेगाडी चालवून बुलडाणा जिल्ह्यात रेल्वे आल्याचे केवळ समाधान होईल त्यातून विकास वगैरे हे जे स्वप्न बुलडाणेकर बघत आहे ते साध्य होणार नाही म्हणून खामगाव जालना या सर्वेक्षणासोबतच शेगाव जालना असे सर्वेक्षण करण्यासाठी आग्रह धरला आहे.