वॉर्ड रचनेत उत्तर दिशा निर्णायक! सुरुवातच होते या दिशेकडून, अंत दक्षिणेला; प्रारूप वाॅर्ड रचना गुप्त ठेवण्याचे निर्देश
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तोंडावर आलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले असून, राजकीय हालचालींना कमालीचा वेग आलाय! यातच निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिल्याने निवडणुकीचा माहौलच निर्माण झाला आहे. यामुळे आता जिल्ह्यातील 11 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वर्तुळाचे आणि आजी- माजी- भावी नगरसेवकांचे लक्ष वाॅर्ड रचनेकडे लागले आहे. या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला आहे.
हजारो स्थानिक नेत्यांचे निवडणूक व राजकीय भवितव्य वाॅर्ड रचना व निघणारे आरक्षण यावरही ठरते. सर्व काही अनुकूल मात्र केवळ वाॅर्डरचना वा आरक्षण अनपेक्षित निघाले तर सर्व समीकरण बिघडून जाते. यामुळे सध्या कच्चा आराखडा तयार होणार असला तरी तो जिल्ह्याच्या नागरी भागातील राजकारण व राजकारण्यांचे लक्ष वेधणारा ठरला आहे. या वाॅर्ड फॉर्मेशनची प्रचंड उत्सुकता असली तरी ती नेमके कशी करतात याबद्धल मोजक्याच जाणकारांना माहिती असते. यासंदर्भात आयोगाने दिलेले निर्देश आणि आज, 24 ऑगस्टला पार पडलेल्या “व्हीसी’मध्ये विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.
कसे होते वॉर्ड फॉर्मेशन
एरवी यम दिशा म्हणून उत्तर दिशा काहीशी गौण मानली जाते. मात्र वाॅर्ड फॉर्मेशनमध्ये हीच दिशा निर्णायक व महत्वाची आहे. याचे कारण म्हणजे याची सुरुवातच या दिशेकडून होते. यानंतर उत्तरेकडून ईशान्य (उत्तर पूर्व) , त्यानंतर पूर्व, पश्चिम आणि शेवटी दक्षिण असा या रचनेचा प्रवास होतो याच क्रमाने वाॅर्ड ना क्रमांक दिल्या जाणार आहे.
मतदारसंख्या अन् दक्षता
दरम्यान वाॅर्डांची मतदारसंख्या ठरवताना पुढील फाॅर्म्युला वापरतात. शहराची एकूण लोकसंख्या भागीले सदस्यसंख्या अशा पद्धतीने ही संख्या ठरणार आहे. फॉर्मेशनमध्ये वस्त्यांचे विभाजन होणार नाही. अनुसूचित जाती, जमाती वस्त्यांचे, एका घराचे, चाळीचे विभाजन होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. वॉर्डाच्या सीमेचे वर्णन करताना रस्ते, नाले, नाल्या, सर्व्हे, दिशा नमूद करावी. तसेच वाॅर्डला क्रमांकासोबतच नाव देण्याचे अधिकार पालिका मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहेत.