राष्ट्रवादीचे लोकप्रिय आमदार लंके शेगावमध्ये!; भाषणाने जिंकली मने!!
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना काळात उपचारासोबतच मानसिक आधार देण्याची गरज होती. ती देण्याचे काम आम्ही केले. याला अनेकांची साथ मिळाली, असे प्रतिपादन पारनेरचे लोकप्रिय आमदार नीलेश लंके यांनी शेगावमध्ये केले. कोरोना काळात २४ तास रुग्णांसाठी काम करणारे श्री. लंके राष्ट्रवादीचे आमदार असून, काल ते आले होते एका खास कार्यक्रमासाठी.
कोरोना काळात जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांसह आशासेविकांचा सत्कार आमदार लंके आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते काल करण्यात आला. मथुरा लॉनवर हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर पक्ष निरीक्षक रवींद्र तौर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अनुजाताई सावळे, जिल्हा परिषद सभापती पुनम राठोड, प्रसेनजीत पाटील, महिला प्रदेश सचिव नंदाताई पाऊलझगडे यांच्यासह अन्य नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार लंके यांनी केलेल्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली.