रात्री आमदार श्वेताताई महाले यांचा औरंगाबादच्या एसपींना फोन!
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतिश गुप्त यांच्यावरील हल्ला हा माझ्या कुटुंबातील व्यक्तीवरील हल्ला असून, राज्यात कायद्याचे राज्य राहिले नसल्याची टीका आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी बुलडाणा लाइव्हला दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाव्दारे केली आहे. गुप्त यांच्यावर मध्यरात्री औरंगाबादजवळ दरोडेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. भारतीय जनता पार्टीतर्फे ठाणेदार अशोक लांडे यांना हल्ल्याच्या निषेधार्थ निवेदनही देण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच आमदार सौ. महाले पाटील यांनी औरंगाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना रात्रीच भ्रमणध्वनीवरून झालेल्या घटनेची माहिती दिली आणि आरोपींना तात्काळ जेरबंद करण्याची मागणी केली. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून आरोपींना अटक केली आहे. आरोपींना तातडीने अटक केली ही पोलिसांची कामगिरी कौतुकास्पदच म्हणावी लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे. ठाणेदारांना निवेदन देताना माजी नगराध्यक्ष सुहाशभाऊ शेटे, माजी नगराध्यक्ष जसवंत श्रीवास्तव, गटनेते प्रा. राजू गवई, शेख अनिस भाई, अंकुशराव पाटील, अशोकसेठ अग्रवाल, विजय नकवाल, नगरसेवक गोविंद देव्हडे, संजय अतार, सुभाषआप्पा झगडे, सुदर्शन खरात, अनुप महाजन, शैलेश बाहेती, सतीश शिंदे, सौ. सुनीताताई भालेराव, सौ. कल्पनाताई ढोकने, सौ. ज्ञानेश्वररी केसकर आदींची उपस्थिती होती.