राणेंना महिनाभरात माज; विरोधी पक्षाने भुंकण्याकरता सोडलंय…; आ. संजय गायकवाडांनी हिशोब चुकता करण्याची दिली धमकी!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य शिवसेनेच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. आपल्या वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या “स्टाइल’मध्ये राणे यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
राणेंचे वक्तव्य केवळ बेतालच नाही तर माज आलेले वक्तव्य आहे. महिनाभरात केंद्रीय मंत्रीपदावर बसल्यानंतर त्यांना माज आल्याचे हे चिन्ह आहे. विरोधी पक्षाने राणेंना केवळ भुंकण्यासाठी सोडलेले आहे. यापुढे असे वागाल तर घरात घुसून तुमचा हिशोब चुकता करू. पोलिसांनी राणे यांच्यावर कारवाई केली नाही तर कोकणात घुसून शिवसैनिक काय आहे हे दाखवून देऊ, असे आमदार गायकवाड म्हणाले. यावेळी आमदार गायकवाड यांनी राणे यांचा कोंबडीचोर म्हणून उल्लेख केला.
राणे म्हणाले होते…
भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली होती. मी असतो तर मुख्यमंत्र्यांच्या कानाखालीच वाजवली असती, अशी टीका राणे यांनी केली होती. यानंतर राज्यभर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. नाशिक सायबर पोलिसांत नारायण राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.