मोठी बातमी… जिल्हा राष्ट्रवादीत लवकरच मोठे फेरबदल!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राष्ट्रवादी परिवार संवाद अभियान अंतर्गत झालेला जिल्हा दौरा वरकरणी शांततेत पार पडला असे चित्र असले तरी ही वादळापूर्वीची शांतता आहे. याचे कारण जिल्ह्यात संघटनात्मक स्तरावर काहीच आलबेल नसून ताळमेळ नसल्याचे संवादकर्त्यांना चांगलेच समजून चुकले. पक्षाचेही पालकत्व सांभाळणार्या नेत्यालाही याची जाणीव झाल्याने लवकरच जिल्हा …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राष्ट्रवादी परिवार संवाद अभियान अंतर्गत झालेला जिल्हा दौरा वरकरणी शांततेत पार पडला असे चित्र असले तरी ही वादळापूर्वीची शांतता आहे. याचे कारण जिल्ह्यात संघटनात्मक स्तरावर काहीच आलबेल नसून ताळमेळ नसल्याचे संवादकर्त्यांना चांगलेच समजून चुकले. पक्षाचेही पालकत्व सांभाळणार्‍या नेत्यालाही याची जाणीव झाल्याने लवकरच जिल्हा राष्ट्रवादीमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल होणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. मार्च एन्ड अखेर पक्षाची धुरा दमदार नेत्यांच्या हाती सोपविण्यात येणार असल्याची शक्यता पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना व्यक्त केली.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतेच राष्ट्रवादी परिवार संवाद अंतर्गत जिल्ह्यात 2 दिवस दौरा केला. दौर्‍यात संवाद बरोबरच त्यांना जिल्हा राष्ट्रवादीमधील विसंवाद देखील दिसून आला. पक्षात खदखद आहे. जिल्हा नेतृत्वावर नाराजी आहे. पण ती उघडपणे मांडणार कोण अर्थात मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? असा सवाल होता. या अंतर्गत असंतोषाला वाचा फोडली ती तटस्थ व निर्भीड पत्रकारितेचा वसा घेतलेल्या बुलडाणा लाईव्हने. दौर्‍याच्या पूर्वसंध्येला प्रसारित वृत्ताने पक्षाचे कमकुवत संघटन, जिल्हाध्यक्षांच्या 9 वर्षांतील कामगिरीचे परखड मूल्यमापन झाल्याची प्रतिक्रिया अनेक नेत्यांनी बुलडाणा लाईव्हकडे व्यक्त केली. ज्येष्ठ नेते विष्णूपंत पाटील यांनी टीका करण्याचे धाडस दाखविले. त्यांचा जिल्हाध्यक्ष होण्याचा राजकीय स्वार्थ असला तरी त्यांनी निवेदनातून मांडलेले मुद्दे दुर्लक्षित करण्यासारखे नक्कीच नाहीत. दुसरीकडे ऐन दौर्‍यात मलकापूर तालुका रायुकाँच्या अध्यक्षांनी दिलेला राजीनामा, नेत्यातील बेबनाव यामुळे खामगावची बैठक शेगावात घ्यावी लागणे, बुलडाण्यात 2 नेत्यांत झालेली जाहीर खडाजंगी, 2 दिवसांत काही नेत्यांनी वैयक्तिकरित्या मांडलेल्या तक्रारी, विधानसभा निहाय आढावा बैठकांतून दिसून आलेली कमजोर स्थिती यातून शरद पवारांच्या मुशीत घडलेले अनुभवी प्रदेशाध्यक्ष काय समजायचे ते समजून गेले. धूर्त व चाणाक्ष आणि काळ वेळेचे भान ठेवून राजकीय सारिपाटावर सोंगट्या वापरणारे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या तीक्ष्ण नजरेतून देखील हे सुटले नाही. यामुळे 8 फेब्रुवारीच्या रात्री सिंदखेड राजातून जिल्ह्याचा निरोप घेण्यापूर्वी श्री. पाटील व डॉ. शिंगणे या दोघांत झालेला संभाव्य फेरबदलावर झालेला दीर्घ संवाद निर्णायक ठरला. या पार्श्‍वभूमीवर पक्षात लवकरच व्यापक फेरबदल होणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. थेट जिल्हाध्यक्ष ते तालुकाध्यक्षांपर्यंत पदाधिकारी बदलण्यात येणार असल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले. बहुतेक पदाधिकारी पदे घेतात अन् मिरवत बसतात, संघटन वाढ अन् शाखा विस्ताराकडे साफ दुर्लक्ष करतात, असे नेत्यांच्या चांगलेच लक्षात आले आहे. यामुळे शोबाज नेत्याऐवजी दमदार, नवीन असले तरी धडपड्या युवा नेत्यांनाही संधी देण्याच्या निर्णयाप्रत नेतृत्व आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले. मात्र कितीही आगपाखड केली अन् निष्ठेचा आव आणला तरी पक्षांतर्गत बाबी चव्हाट्यावर आणणार्‍या नेत्यांना पद न देण्यावर वरिष्ठ नेते ठाम असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.