मेगा ब्रेकिंग!लसीकरण केंद्रांवर लोकप्रतिनिधींना नो एन्ट्री!; राज्य निवडणूक आयोगाचे सक्त निर्देश
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः येत्या 16 जानेवारीला आयोजित कोरोना लसीकरण प्रसंगी उपस्थित राहून आपली जनतेशी (अर्थात मतदारांशी) असलेली कथित बांधिलकी दाखविण्याचा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विचार असतील तर तो विचार त्यांनी रद्द केलेलाच बरा! याचे कारण दसुरखुद्द राज्य निवडणूक आयोगाने याला मनाई केली आहे. यामुळे 16 जानेवारीला जवळपास दिवसभर पार पडणार्या 6 केंद्रांवरील कोविशिल्ड लसीकरण मोहिमेपासून जिल्ह्यातील नेतेमंडळींना डिस्टन्स पाळावेच लागेल.
यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे रायगड व अन्य जिल्ह्यांतून मार्गदर्शन मागविण्यात आले होते. यावर आजच आयोगाने स्पष्ट निर्देश देत लसीकरण केंद्रांवर लोक प्रतिनिधींना आमंत्रित करता येणार नाही, असा खुलासा केला आहे. सध्या राज्यात 14 हजारांवर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनिमित्त आदर्श आचारसंहिता लागू असल्याने नेत्यांना बोलावूच नये, असे राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी सुनावले आहे. अर्थात मुंबई व उपनगर हे जिल्हे वगळता बुलडाणा सारख्या जिल्ह्यांना हे निर्देश लागू असल्याचे नमूद आहे. आज 14 जानेवारीला दुपारी हे निर्देश आल्याने मिरविण्यावर बंदी आल्याने तीळ- गुळ खाऊनही नेत्यांचे तोंड कडू झाले असेल हे मात्र नक्कीच!