मिशन स्वबळ! पक्ष संघटनेच्या आढाव्यासाठी जयंत पाटील दोन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर, विधासभानिहाय घेणार बैठका

बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा संघटनात्मक आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात मुक्कामी दौरा करणार आहेत. यावेळी ते 7 विधानसभा निहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार असून, जलसंपदावर बैठक घेणार आहे.राज्यातील आघाडी सरकारमध्ये सहभागी असले तरी राष्ट्रवादीने स्वतःच्या पक्ष संघटना बांधणीवर कायम …
 

बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा संघटनात्मक आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात मुक्कामी दौरा करणार आहेत. यावेळी ते 7 विधानसभा निहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार असून, जलसंपदावर बैठक घेणार आहे.
राज्यातील आघाडी सरकारमध्ये सहभागी असले तरी राष्ट्रवादीने स्वतःच्या पक्ष संघटना बांधणीवर कायम जोर दिला आहे. येत्या काळातील बहुतेक निवडणुका स्वबळावर लढण्याचे मनसुबे पक्षाने आखले आहे. त्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनात जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राज्यव्यापी संघटन बांधणी व आढावा दौर्‍याची घोषणा केली होती. या अंतर्गत ते बुलडाण्यात सुमारे 2 दिवस तळ ठोकून राहणार असून 7 व 8 फेब्रुवारीला यासाठी जिल्ह्यात दाखल होणार आहे. शेगाव येथील संत गजानन महाराज यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन ते दौर्‍याला प्रारंभ करणार असून राजमाता जिजाऊंच्या चरणी मानाचा मुजरा करून जिल्ह्याचा निरोप घेणार आहेत. 7 फेब्रुवारीला संध्याकाळी 4 वाजता जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचा संघटनात्मक आढावा घेणार आहेत. यानंतर सव्वापाच वाजता खामगाव मतदारसंघाच्या आढाव्यानंतर ते बुलडाण्यात मुक्कामी राहतील. दरम्यान 8 तारखेला सकाळी 9 वाजता ते जिल्हा कचेरीत जलसंपदा अधिकार्‍यांसोबत बैठक घेणार आहेत. यापाठोपाठ जिल्हा कार्यकारिणी व नंतर जिल्हा कार्यकर्ता बैठक घेतल्यावर ते सकाळी सव्वा अकरा वाजता बुलडाणा विधानसभा, दुपारी 12 वाजता मलकापूर, दीड वाजता चिखली, 2 वाजता मेहकर मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. यानंतर दुपारी 3 वाजता सिंदखेडराजाकडे रवाना होऊन संध्याकाळी 5 वाजता सिंदखेडराजा मध्ये राष्ट्रवादी परिवार परिसंवाद व नंतर आढावा बैठकीत मार्गदर्शन करतील. यानंतर मंत्री पाटील औरंगाबादकडे रवाना होणार आहेत.