माजी आमदार हर्षवर्धन सपकाळांवर गंभीर आरोप!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामपंचायतीच्या राजकारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय लहाने यांनी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनुसूचित जातीचे बनावट प्रमाणपत्र तयार करून काँग्रेसने धाडचे सरपंचपद मिळवले. आता तसाच प्रकार देऊळघाटमध्ये सुद्धा करण्याची तयारी हर्षवर्धन सपकाळ करत आहेत. त्यासाठी सपकाळ दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ग्रामपंचायतीच्या राजकारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय लहाने यांनी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनुसूचित जातीचे बनावट प्रमाणपत्र तयार करून काँग्रेसने धाडचे सरपंचपद मिळवले. आता तसाच प्रकार देऊळघाटमध्ये सुद्धा करण्याची तयारी हर्षवर्धन सपकाळ करत आहेत. त्यासाठी सपकाळ दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून बसले आहेत व प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप श्री. लहाने यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे.

देऊळघाटच्‍या सरपंचपदाची निवडणूक 9 फेब्रुवारी रोजी होणार होती. त्यासाठी अनुसूचित जाती महिलांचे आरक्षण होते. ठरलेल्या दिवशी सर्व ग्रामपंचायत सदस्य हजर असताना एकाही महिलेने अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अनुसूचित जाती महिला ऐवजी केवळ अनुसूचित जाती असा बदल करत सरपंच पदाची निवडणूक 26 फेब्रुवारी रोजी घेण्याचे आदेश दिले होते. मात्र माजी आमदार सपकाळ यांनी 26 फेब्रुवारीच्‍या निवडणुकीवर आक्षेप घेत निवडणूक पुढे ढकलण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकला. आज तेच आमदार एका महिलेचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकत आहेत. जर त्या महिलेकडे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र होते तर त्यांनी 9 फेब्रुवारी रोजी ते सादर का केले नाही, असा सवाल श्री. लहाने यांनी केला आहे. त्यामुळे या महिलेचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे त्‍यांनी म्हटले आहे. खोटेनाटे व बनावट दस्ताऐवज तयार करून सत्ता मिळवणे हेच एकमेव उद्दिष्ट सपकाळ यांचे आहे. त्यामुळे त्यांच्याच कार्यकर्त्यांविरद्ध गुन्हे दाखल होतील मात्र सपकाळ यांना केवळ सत्ता महत्वाची आहे. कार्यकर्त्यांची त्यांनी कवडीचीही चिंता नाही, असा घणाघात दत्तात्रय लहाने यांनी केला आहे.