बुलडाणा वैद्यकीय महाविद्यालयास खासगी भागीदारीतून नव्हे तर शासकीय खर्चातून मान्यता द्या; आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांची मागणी
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाण्यासह 19 जिल्ह्यांतील वैद्यकीय महाविद्यालये खासगी भागीदारीतून स्थापन न करता शासकीय निधीमधून स्थापन करण्याची मागणी चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.
सद्यःस्थितीत शासनाकडे उपलब्ध असणारे मर्यादित वित्तीय स्रोत विचारात घेता, राज्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय स्थापन करण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी धोरण (PPP)ठरविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. या धोरणानुसार 19 नवीन मान्यता प्राप्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. यात बुलडाणा येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ४३० रुग्णखाटांचे संलग्नित रुग्णालय निर्माण करण्याचा देखील समावेश आहे. खासगी भागीदारीचे धोरण निश्चित झाल्यावर बुलडाणा येथील वैद्यकीय महाविद्यालयास मान्यतेचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर होणार आहे.
खासगी भागीदारीमधून बुलडाणा व इतर जिल्ह्यांतील वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या शासनाच्या हालचाली या बुलडाणा जिल्ह्यासारख्या अति मागास आणि वैद्यकीय सुविधा नसलेल्या आणि वैद्यकीय सुविधांची नितांत आवश्यकता असलेल्या जिल्ह्यासाठी अन्याय करणारी आहे. कारण खासगी भागीदारीसाठी कुणीही पुढे येणार नाही. तसेच कुणी पुढे आला तरी खासगी भागीदारीमधून स्थापन झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयामधून गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार होणार नाहीत. त्यामुळे खासगी भागीदारीमधून वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणे म्हणजे गोरगरिबांवर अन्याय असल्याची भावना आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बुलडाणा येथील समर्पित कोविड रुग्णालयाचे ऑनलाइन लोकार्पण करताना बुलडाणा येथील वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता देण्याचे आश्वासन दिलेले असल्याची देखील आठवण पत्रातून करून दिली आहे.
‘सकारात्मक अभिप्राय द्या’
आरोग्यमंत्री आणि आरोग्य विभागाकडून बुलडाणा वैद्यकीय महाविद्यालयासाठी सकारात्मक अभिप्राय देऊन बुलडाणा व इतर ठिकाणच्या नवीन वैद्यकीय महाविद्यालय खासगी भागीदारीतून स्थापन न करता शासकीय खर्चातून मान्यता देऊन तातडीने कार्यान्वित करण्याबाबत शिफारस करण्याचीदेखील मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी आरोग्यमंत्री ना राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.