बुलडाणा तालुक्यात आघाडीचा बोलबाला!, घटक पक्ष वेगळे लढले पण जिंकले!! 51 ग्रामपंचायतींमध्ये सत्तेसाठी तीव्र चुरस
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः बुलडाणा तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींचे निकाल आज, 18 जानेवारीला जाहीर झाले असून, बहुतेक ठिकाणी राज्यातील महाआघाडीत सहभागी पक्षांनीच बाजी मारल्याचे वृत्त आहे. आघाडीतील हे पक्ष अनेक ठिकाणी स्वतंत्र व एकमेकांविरुद्ध लढले असले तरी बहुतेक जागी या 3 पक्षांच्या समर्थकांनी बाजी मारल्याचे चित्र आहे. परिणामी आता 51 ठिकाणी सत्ता प्राप्तीकरिता तीव्र चुरस राहणार असून, निवडणुकीत भरकटलेले हे घटक पक्ष सत्तेसाठी एकत्र येतील का, असा प्रश्न ऐरणीवर आलाय.
आज सोमवारी सकाळी 9 वाजता बुलडाणा तहसीलमध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला. सोशल डिस्टन्सिंगचे निर्देश पायदळी तुडवत पहिल्या टप्प्यात जाहीर झालेल्या सागवान, देऊळघाटच्या निकालापासून तालुक्यातील संभाव्य निकालाची चुणूक दिसून आली. यामुळे धाड, डोंगरखंडाळा, रायपूर, सातगाव म्हसला, भादोला, कोलवड, साखळी बुद्रुक, मातला, केसापूर, पांगरी, वरवंड, गुम्मी, पाडळी, मढ, जामठी, अजीसपूर, अंभोडा, नांद्रा कोळी, बिरसिंगपूर, शिरपूर, तांदुळवाडी या प्रमुख ग्रामपंचायतींच्या रणसंग्रामात अनेक दिग्गज पराभूत झाले. त्यांना अनपेक्षितपणे नवख्या उमेदवाराकडून चित व्हावे लागले. मात्र रायपूर पट्टा सोडला तर कोलवड ते चांडोळ या दीर्घ पट्ट्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी बाजी मारल्याचे चित्र आहे. सावळा सुंदरखेड सर्कल ते डोंगरखंडाला या पट्ट्यात देखील आघाडीच्या घटक पक्षांचा बोलबाला असल्याचे दिसून आले. मतदारांनी नवीन चेहर्यांना काही ठिकाणी संधी दिली असली तरी प्रस्थापित नेत्यांना एकदम हद्दपार करण्याचे टाळले. यामुळे ग्रामीण भागातील काँग्रेस, राष्ट्रवादी व सेना या तीन पक्षांची ताकद दाखविणारे व भाजपला अजूनही खूप मेहनत घेण्याची गरज असल्याचे तालुक्यातील निवडणुकीने दाखवून दिले. तसेच राज्यात आघाडी असली तरी घटक पक्षात ग्रास रूट वर बिघाडीच आहे हे देखील सिद्ध झाले आहे.