बिग ब्रेकिंग! बुलडाण्याचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कार्यालयावर ‘इडी’चे छापे! सिटी बँक घोटाळा प्रकरण; प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आपल्या राजकीय इनिंगची बुलडाणा जिल्ह्यातून सुरुवात करून खासदारकीच नव्हे केंद्रीय मंत्रिपद मिळवणारे आणि आजही जिल्ह्यात हजारो चाहते असणारे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या मुंबईस्थित कार्यालयावर केंद्र शासनकृत “ईडी’ने छापे घातले. यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मुंबईतील सिटी सहकारी बँकमधील 900 कोटी रुपयांच्या कथित महाघोटाळ्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
आज, 27 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजताच्या आसपास त्यांच्या कांदिवली स्थित कार्यालयावर 4 सदस्यीय “ईडी’च्या पथकाने छापे घातले. सिटी बँकेचे अडसूळ माजी अध्यक्ष होय. या बँकेत 900 कोटींचा घोटाळा झाल्याची तक्रार “ईडी’कडे करण्यात आली होती. अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा व ज्येष्ठ भाजपा नेत्यांनी याविरुद्ध आवाज उठविला. अलीकडे कमालीचे कार्यतत्पर झालेल्या ईडीने आज ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान प्रकृती गंभीर झाल्याने अडसूळ यांना गोरेगाव स्थित लाईफटाइम मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले, यामुळे कारवाई मध्ये व्यत्यय आला.
बुलडाणा ठरले शुभ…
सहकार क्षेत्रातील आक्रमक कामगार नेते, सातारा जिल्ह्यातील रहिवासी, मुंबईत वास्तव्य असा चौफेर जीवन प्रवास असलेल्या आनंदराव अडसूळ यांच्या राजकीय उत्कर्षाची सुरुवात दूरवरच्या बुलडाणा जिल्ह्यातून झाली. अगोदर भाजपकडे असलेला बुलडाणा लोकसभा मतदारसंघ 1996 सेनेकडे आल्यावर उमेदवाराचा शोध अडसुळापर्यंत येऊन ठेपला होता. 1996 मध्ये विजय, 1998 मध्ये पराजय, 1999 आणि 2004 मध्ये विजय असा त्यांचा पॉलिटिकल ट्रॅक राहिला. यादरम्यान पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पद भूषविण्याचा बहुमान मिळाला. यामुळे बुलडाणा जिल्ह्याचे ते कायम ऋणी राहिले. यामुळे आजच्या कारवाईने जिल्ह्यातील शिवसैनिक व सामान्य चाहते यांच्यात खळबळ उडाली आहे.