फौजदारी कारवाई दोन महिने टळली!! खातूनबी सय्यद गफ्फार यांना दिलासा, हायकोर्टाचा २४ नोव्हेंबरपर्यंत स्टे!
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने धाड ग्रामपंचायतीच्या कारवाईग्रस्त सरपंच खातूनबी सय्यद गफ्फार यांच्या विरुद्ध फौजफारी कारवाई करण्यास २४ नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. यामुळे त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांना सव्वा दोन महिन्यांपुरता का होईना दिलासा मिळाला आहे.
फेब्रुवारी २०२१ मध्ये पार पडलेल्या धाड सरपंचपदाच्या निवडणुकीत खातूनबी यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. बहुमतामुळे त्या सरपंचपदी विराजमान झाल्या. मात्र फेब्रुवारी महिन्यात ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या महार जातीच्या प्रमाण पत्रावर जालना येथील जात पडताळणी समितीने प्रश्न उपस्थित करीत त्यांची सरपंचपदी झालेली निवड निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करावी, तसेच जालना एसडीओ यांना त्यांच्याविरुद्ध फोजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान या निर्णयाला आव्हान देत खातूनबी यांनी ॲड. एस. एस. ठोंबरे यांच्यामार्फत नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा व एस. व्ही. गंगापूरवाला यांच्या समक्ष प्राथमिक सुनावणी व युक्तिवाद पार पडला. याप्रकरणी न्यायाधीशांनी २४ नोव्हेंबरपर्यंत फौजदारी कारवाई करण्यास “स्टे’ दिला.