फेसबुक लाइव्ह करून गरिबांचे हाल कळणार नाहीत; त्यासाठी आतातरी रस्त्यावर उतरा; आमदार श्वेताताई महाले पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः फेसबुक लाइव्ह करून लॉकडाऊनमुळे गोरगरिबांचे होणारे हाल कळणार नाहीत. त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असे प्रत्युत्तर चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. आज, 3 एप्रिलला मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्ह करत राज्यातील जनतेशी संवाद साधला त्यावर श्वेता महाले यांनी ट्विट करत टीका केली आहे.
काय म्हणाल्या आमदार महाले पाटील?
लॉकडाऊनमुळे गोरगरिबांचे किती हाल होतात? हे फेसबुक लाइव्ह करून समजणार नाही. मुख्यमंत्री महोदय त्याकरिता रस्त्यावर उतरून त्यांच्या समस्या जाणून घेण्याची गरज आहे. आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत. लोकांच्या मदतीला. सांगा आपण रस्त्यावर उतरून कधी मदत करणार गरिबांना?, असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
इतर राज्यांनी पॅकेजची घोषणा केली, महाराष्ट्रात मात्र काहीच नाही…
कोरोना संकटामुळे गोरगरिबांच्या जीवनात आर्थिक संकट आले आहे. उद्योग, व्यापार या सर्वांवर परिणाम झाला आहे. देशातल्या अनेक राज्यांनी यासाठी पॅकेजची घोषणा केली. यात काँग्रेस शासित राजस्थान आणि केरळचाही समावेश आहे. मात्र महाराष्ट्राने दमडीचीही घोषणा केली नाही, असे आमदार महाले पाटील बुलडाणा लाइव्हशी बोलताना म्हणाल्या.