पाच हजारांवरील गावात विलगीकरण कक्ष सुरू करा; आमदार श्वेताताई महाले यांचे बैठकीत निर्देश
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा त्यात व्हेंटिलेटरची कमतरता यामुळे लोकांचे जीव जात आहे. भविष्यात तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली असल्याने गाव पातळीवर यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे. किमान पाच हजार लोकसंख्येवरील प्रत्येक गावात विलगीकरण कक्ष सुरू करा, अशी सूचना आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी केली. कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव थांबविण्यासाठी घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत 10 मे रोजी त्या बोलत होत्या.
ईसोली, उंद्री, अमडापूर, सवणा व मेरा ही गावे पाच हजारांच्या वर लोकसंख्या असलेली गावे असून, या गावात विलगीकरण कक्ष स्थापन करण्यासाठी शासनाचा निधी नसल्याने आणि गावातील नागरिकांची व्यवस्था गावातच करणे गरजेचे असल्याने गावातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या दानशूर व्यक्तींनी विलगीकरण कक्ष स्थापन करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
चिखली तहसील कार्यालयात ही बैठक झाली. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे, गटविकास अधिकारी श्री. जाधव, नगर परिषद मुख्याधिकारी अभिजित वायकोस, ठाणेदार गुलाबराव वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खान, ,वैद्यकीय अधीक्षक डॉ. खान, गटशिक्षणाधिकारी श्री. शिंदे यांची उपस्थिती होती. बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यात रुग्णांना बेड मिळण्यासाठी तालुका स्तरावर हेल्प सेन्टर स्थापन करणे, रेमडेसिवीर इंजेक्शन न मिळणे, रेमडेसिवीरचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना करणे तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आणि रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषींवर कारवाईचा बडगा उगारला पाहिजे, असे बैठकीत उपस्थित मान्यवरांचे एकमत झाले. RTPCR चे रिपोर्ट आठ आठ दिवस येत नाही त्यासाठी चिखली येथे लॅबला मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव सादर करणे. ग्रामीण भागात अलगीकरण कक्ष स्थापन करणे ,लॉक डाउन काळात कायदा व सुव्यवस्था राखणे चिखली येथील समर्पित कोविड हेल्थ रुग्णालय तातडीने सुरू होण्यासाठी निवासस्थानाचे दुरुस्ती जलदगतीने पूर्ण करणे, लसीकरण बाबत जनजागृती आणि लस उपलब्ध करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना , पॉझिटिव्ह रूग्ण फिरत असल्याने त्यांच्यामुळे वाढणारा संसर्ग कमी करण्यासाठीच्या उपाययोजना, लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसाला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठीच्या उपाययोजना घरपोच पुरवठा करण्यासाठी आवाहन करणे याबाबत चर्चा व उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी दिल्या.
खासगी दवाखान्याची बिले तपासणीसाठी लेखाधिकारी यांची नियुक्त्या
खासगी डॉक्टर अव्वाच्या सव्वा बिले देऊन लूट करत आहे अशा अनेक तक्रारी येत आहे. खासगी डॉक्टर देत असलेली बिल योग्य की अयोग्य यासाठी शासनाने सांगितले आहे. परंतु आतापर्यंत कोणत्याही डॉक्टरांची बिले तपासलेली नाही. त्यासाठी प्रत्येक दवाखाना निहाय लेखाधिकारी यांची नेमणूक करून त्यांचे बिले तपासणी करण्यात येणार आहेत. यासाठी चिखली नगरपालिका हद्दीत ऑफिस उघडून त्याठिकाणी खासगी डॉक्टर यांच्याकडून मिळालेली बिले तपासून त्यांच्या लूट करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात येणार आहे. समिती लवकरच समितीचे स्वरूप जाहीर होणार आहे. यासाठी हेल्पलाईन सेन्टर सुद्धा उघडण्यात येणार असून कुणाच्या तक्रारी असल्यास नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी केले आहे.
शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे देण्यासाठी कृषी यंत्रणा सज्ज ठेवा
शेताच्या बांधावर खते बियाणे देण्यासाठी कृषी विभागाने सज्ज राहून कृषी सेवक , कृषी सहायक यांनी शेतकऱ्यांकडून खते व बियाण्याची मागणी नोंदवून त्यांच्या बांधावर खते व बियाणे देण्याच्या सूचना आमदार सौ श्वेताताई महाले यांनी केल्या.